पुण्यात शिकणारा दर्पेश डिंगर करणार राजपथावरील ‘एनएसएस’ पथकाचे नेतृत्व

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी देशभर सुरु आहे. प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत होणाऱ्या संचलनाला विशेष महत्व असते. यंदा राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राकडे आला आहे. पुणे येथील ‘सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग’चा विद्यार्थी दर्पेश डिंगर एनएसएस पथकाचे नेतृत्व करणार आहे.

महाराष्ट्रातील सर्वच १४ आणि गोव्यातील २ अशा एकूण १६ विद्यार्थी-विद्यार्थिनींची या पथसंचलनासाठी निवड झाली आहे. देशभरातील १५ विभागांमधून एकूण २०० एनएसएस स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले असून यापैकी १६० विद्यार्थ्यांची पथसंचलनासाठी निवड झाली आहे.

दर्पेशच्या मेहनतीला यश
दर्पेश मूळचा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुकयातील तोकडे गावचा आहे. त्याने आवाज, शिस्त, नियमितता व मेहनतीच्या जोरावर राजपथावरील पथसंचलनात एनएसएस पथकाच्या नेतृत्वाचा मान पटकविला आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावर पथसंचलनात सहभागी होण्यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांमध्ये देशपातळीवर मोठी स्पर्धा असते. पथसंचलनातून संपूर्ण देशातील सामर्थ्य व संस्कृतीचे दर्शन घडते या सोहळ्यात सहभागी १६० विद्यार्थ्यांच्या एनएसएस पथकाचे नेतृत्व करायला मिळणे ही अभिमानाची बाब असल्याची भावना दर्पेशने व्यक्त केली.
यापूर्वी प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या सोपान मुंडे, खूशबु जोशी आणि आसीफ शेख यांनी मिळविला आहे.यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांतर्गत येथील चाणक्यपुरी भागातील इंटरनॅशनल युथ होस्टेल येथे एनएसएस सराव शिबिराला १ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. एनएसएसच्या देशभरातील १५ विभागांमधून एकूण २०० विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.