धक्कादायक ! IPL मध्ये ‘या’ संघाकडून खेळताना करावा लागला वर्णव्देषाचा सामना : डॅरेन सॅमी

पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूनंतर वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ख्रिस गेल, डॅरेन सॅमी यांनीही या प्रकरणावर मत मांडले आहे. ख्रिस गेलने क्रिकेटमध्येही खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो असे विधान केले. तर सॅमीने आयसीसीला याविरोधात भूमिका घेण्याचे आवाहन केले होेते. सॅमी आणि ख्रिस गेल यांना खेळत असताना अनेकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचे सांगितले आहे. यानंतर डॅरेन सॅमीने आयपीएलमध्ये सनरायझर्र हैदृाबाद संघाकडून खेळत असतानाही वर्णद्वेषी टोमणे सहन करावे लागले असे म्हटले आहे.

आयपीएलमध्ये खेळत असताना मला काळू या नावाने हाक मारायचे. मला आता त्या शब्दाचा अर्थ कळतो आहे. मी आणि थिसारा परेराला संघात काळू नावाने बोलावले जात होते. मला वाटले हा कुठलातरी चांगला शब्द असेल. हे समजल्यावर मला आणखीनच दुःख झाल्याचे सॅमीने इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटले आहे. याआधीही सॅमीने ट्विटर अकाऊंटवर फ्लॉयड यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत, क्रिकेटमध्ये आपल्यासारख्या खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना कसा करावा लागतो याबद्दल माहिती दिली होती. दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावरही याआधी अनेकदा वर्णद्वेषाच्या घटना घडल्या आहेत. इंग्लंडचा नवोदीत अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चरला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात वर्णद्वेषी टिपण्णी ऐकावी लागली होती. आर्चरने सोशल मीडियावर याचा खुलासा केला होता. जॉर्जच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रदर्शन करणार्‍या नागरिकांविरोधात सैन्यदल रस्त्यावर उतरवण्याचा इशारा दिला आहे.