काय सांगता ! होय, वेस्टइंडिजला 2 वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन बनणार ‘पाकिस्तानी’ नागरिक, केलाय अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्टइंडीजच्या संघाचा माजी कर्णधार आणि लागोपाठ दोन टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारा अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारु इच्छित आहे. त्यासाठी त्याने अर्ज देखील केला आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मी संघाचे नेतृत्व करणाऱ्या सॅमीचे पाकिस्तानात क्रिकेट सुरु करण्यात मोठे योगदान आहे.

पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा यंदा पाचवा हंगाम खेळवला जात आहे, ज्याच्या दुसऱ्या हंगामातील अंतिम सामना पाकिस्तानात खेळवण्यात आला होता. या दरम्यान डॅरेन सॅमीने पीएसएल संघ पेशावर जाल्मीचे नेतृत्व केले होते आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. डॅरेन सॅमीपूर्वी कोणताही परदेशी खेळाडू पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास तयार नव्हता. परंतू सॅमी तेथे गेला आणि क्रिकेट खेळला. 2009 मध्ये श्रीलंका संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्यानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट बंद होते.

संघ मालकाने केला खुलासा –
पाकिस्तानी वृत्तानुसार, पेशावर जाल्मी संघाचे मालक जावेद अफरिदी म्हणाले, डॅरेन सॅमी त्यांच्या संघाचे अविभाज्य भाग आहेत आणि त्यांनी पाकिस्तानच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. एवढेच नाही तर जावेद यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डला सॅमी यांना नागरिकत्व मिळण्याच्या प्रकरणात मदत करा अशी विनंती केली आहे. त्यामुळे पाकिस्तान सॅमीला नागरिकत्व देऊ शकते.

पीएसएलचा संपूर्ण सीजन यंदा पाकिस्तानातच खेळवला जाईल. यापूर्वी काही सामने पाकिस्तानात होत होते. त्यामुळे यंदा सर्वात आधी डॅरेन सॅमी पीएसएलसाठी पाकिस्तानात पोहोचला आहे. डॅरेन सॅमी यावर बोलताना म्हणाला की, मला आता पाकिस्तान फार आवडतो. मी मागील वेळी 2017 साली पीएसएल अंतिम सामन्यासाठी येथे आलो होते. यंदाच्या पीएसएलसाठी देखील मी उत्सुक आहे. प्रत्येक देशातील क्रिकेट प्रेमी देशातील मैदानांवर क्रिकेट खेळवला जावा यासाठी इच्छुक असतो आणि पाकिस्तानी क्रिकेट प्रेमी अनेक वर्ष झाले, यापासून वंचित आहेत.