Sangli News : इस्लामपूरच्या उरुण परिसरात गव्याचे दर्शन

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात अनेक ठिकाणी गवा , बिबट्या आढळून आल्याची बातमी कानी पडत आहे. आता इस्लामपूर येथील उरुण परिसरातील शेतीशिवारात गवे आले आहेत. गव्यांच्या कळपाचे दोन दिवसांपासून दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या जंगली गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी वन अधिकाऱ्यांकडे केली आहे. उरुण भागाच्या पूर्व आणि दक्षिण भागात शेतीचे मोठे क्षेत्र आहे. खोलवाट शिवारामध्ये या गव्यांच्या कळपाचे गेल्या दोन दिवसांपासून दर्शन होत आहे.

उरुण या परिसरात शेतकऱ्यांची घरेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच इतर नागरिकांची या रस्त्यावरून ये-जा सुरू असते. या परिसरात जंगली गव्यांचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रहारच्या दिग्विजय पाटील, सिद्धार्थ पाटील, अनिकेत पाटील यांनी येथील वनपाल शिंदे यांना निवेदन देऊन गव्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे.