Indapur News : काल राज्यमंत्री भरणेंकडून अपघातग्रस्ताला मदत, आज मुलाची गाडी बनली Ambulance !

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन –  राजकारण असो वा कोणतंही क्षेत्र अनेक मुलं वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे येतात. मात्र आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी फार थोडी असतात. मात्र याचा प्रत्यय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) आणि त्यांच्या मुलगा श्रीराज भरणे ( Shriraj Bharane) या दोघा पिता- पुत्राच्या रुपाने इंदापूरसह महाराष्ट्राला दिसून येत आहे. काल राज्यमंत्री भरणे आणि एका अपघातग्रस्ताला मदत केली होती. तर त्यांचा मुलगा श्रीराज भरणे यांची आलिशान गाडी गुरुवारी (दि. 14) एका अपघातग्रस्तासाठी चक्क रुग्णवाहिका बनली अन् त्याला इंदापूर येथील रुग्णालयात दाखल केले.

राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची एक संवेदनशील राजकारणी म्हणून राज्याला ओळख आहे. मदतीला धावून जाण हा त्यांचा स्थायीभाव. गेल्या अनेक महिन्यांपासून अपघातग्रस्तांना मदत केल्याचे भरणेंचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा सुपुत्र श्रीराज भरणे हा देखील अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकला आहे. श्रीराज यांची आलिशान गाडी गुरुवारी (दि. 14) एका अपघातग्रस्तासाठी चक्क रुग्णवाहिका बनली. श्रीराजने पुन्हा एकदा अपघातग्रस्ताला मदत केली असून रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्ताला आपल्या स्वतःच्या आलिशान गाडीत घेऊन श्रीराज यांनी त्यास तात्काळ उपचार मिळवून दिले.

श्रीराज हे आज खाजगी कामासाठी अकलूजला गेले होते. अकलुजहून इंदापूरला परतत असताना सुरवड या गावी एका दुचाकीचा अपघात झालेला होता. दुचाकीस्वार हा रस्त्यावरती पडलेला दिसताच श्रीराज भरणे यांनी तात्काळ आपली गाडी थांबवली अन् त्या जखमी दुचाकीस्वाराला आपल्या गाडीत घेतले. यावेळी राज्यमंत्री भरणे यांचे विश्वासु अंबादास लांडगे यांनी ही मौलाची मदत केली. तसेच अपघातग्रस्ताला इंदापूर येथील एका खासगी दवाखान्यात आणले व त्याच्यावरती उपचार करण्याची विनंती डॉक्टरांना केली. श्रीराज भरणे यांनी 19 डिसेंबरला ही अशाच पद्धतीने अपघातग्रस्ताला मदत केली होती. या संदर्भातील व्हिडीओ इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. काल (बुधवारी) देखील राज्यमंत्री भरणे यांनी दौंड तालुक्यातील रावणगाव नजीक येथे अपघातग्रस्ताला धीर दिला होता. तसेच त्याच्या उपचाराची व्यवस्था केली होती.