15 हजार गिरणी कामगारांना घरे मिळवून देणारे कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईतील १५ हजार गिरणी कामगारांना कायमस्वरुपी घरे मिळवून देणारे गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर (वय ७२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. दत्ता इस्वलकर हे गेल्या ३ वर्षांपासून आजारी होते. बुधवारी सकाळी त्यांच्या मेंदुत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले, नातवंडे असा परिवार आहे.

२ ऑक्टोबरर १९८९ रोजी गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी संघर्ष करण्यास सुरुवात केली. त्याच दिवशी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली. ते आजपर्यंत समितीचे अध्यक्ष होते. बंद पडलेल्या १० गिरण्या त्यांच्या नेतृत्वाखाली १९८८ – ९० च्या दशकात सुरु केल्या. त्यानंतर त्यांनी गिरणी कामगारांना स्वेच्छा निवृत्तीपोटी चांगले पैसे मिळवून दिले. गिरण्यांच्या जमिनीवर कामगारांना घरे आणि रोजगार मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचे विराट मोर्चे काढण्यात आले. त्याचा परिणाम आतापर्यंत गिरण्यांच्या जमिनीवर १५ हजार कामगारांना घरे मिळाली. तसेच गिरण्या चाळीतील ७ ते ८ हजार कामगारांना कायमस्वरुपी घरे मिळवून दिली. त्यांच्या निधनाने कामगारा चळवळीतील संघर्ष करणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.