जेजुरी : श्री क्षेत्र नारायणपूरला दत्त जयंती सोहळा उत्साहात सुरू

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – श्री क्षेत्र नारायणपूर, ता. पुरंदर येथे नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ते ११ डिसेंबर या काळात दत्तजयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त काल ९ डिसेंबर रोजी अखंड प्रज्वलित अग्नी यज्ञकुंडाचा एकोणिसावा वर्धापन दिन साजरा झाला. सायंकाळी पालखी प्रदक्षिणा व दोनशे कोटी शिवदत्त नामयज्ञ या ठिकाणी होम हवन झाले.

१० डिसेंबर रोजी दत्त मंदिरात दत्त जन्म सोहळा सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. त्यापूर्वी दुपारी विविध गावांतून येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत केले जाईल. तसेच, दत्त जन्मप्रसंगी नारायण महाराज यांचे व्याख्यान, आरती, नाव ठेवणे, पाळणा, पुष्पवृष्टी, सुंठवडा वाटप व देव भेटविणे, कार्यक्रम होणार आहेत. ११ डिसेंबर दत्तजयंतीचा समारोपाचा दिवस आहे.

या दिवशी सकाळी मंदिरात आरती होऊन पालखी ग्राम प्रदक्षिणेला सुरुवात होईल. या वेळी विविध पथके, हत्ती, घोडे, उंट, ढोल – लेझीमच्या गजरात पालखी चंद्रभागा स्नानासाठी प्रस्थान ठेवेल. चंद्रभागा स्नान झाल्यानंतर पुन्हा पालखी मंदिरात येऊन या ठिकाणी पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन रात्री १२ वाजता आरतीने सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती श्री दत्तसेवेकरी मंडळाच्या वतीने देण्यात आली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like