कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणाचा तपास CBI कडे द्या अन्यथा कुटूंबासह आमरण उपोषण : माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – चिखली येथील संपर्क कार्यालयावर हल्ला करणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र कोणत्याही प्रकारची कबुली न मिळाल्याने त्यांना सोडून देण्यात आले. या तपासात राजकीय दबावापोटी आर्थिक उलाढाल झाली असून अनेक फेरबदल झाले असल्याचा संशय माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी वर्तविला आहे. यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक
करुन तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा. अन्यथा २ मार्चपासून कुटूंबासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा साने यांनी दिला आहे.

पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यासंदर्भात दत्ता साने यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाच्या प्रती साने यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र राज्य गृहमंत्री अनिल देशमुख आणि जिल्हाधिकारी पुणे यांना दिल्या आहेत.

या निवेदनात म्हटले आहे की, ७ जून २०१९ रोजी चिखली येथील त्यांच्या संपर्क कार्यालयावर सशत्र हल्ला झाला होता. यावेळी हल्सेखोरांनी कार्यालयातील दत्ता साने यांच्या फोटोवर कोयत्याने वार केले होते. तसेच संगणक आणि इतर साहित्याची तोडफोड करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. दत्ता साने यांना संपवण्याचा मुख्य उद्देष या हल्ल्यामागे होता असेच दिसून येतेय. याप्रकरणी साने चौक येथील पोलीस चौकीत गुन्हा दाखल करून चिखली पोलीस ठाण्याकडे देण्यात आला. तिथे तपास व्यवस्थीत जमत नसल्याने क्राईम युनिट १ यांच्याकडे तपास देण्यात आला. कोणाच्यातरी सांगण्यावरून या तपासामध्ये वारंवार फेरबदल होत असल्याचे दिसुन आले. त्यामुळे पोलीस तपासकावर संशय देखील बळावतो आहे. ह्या तपासामध्ये खुप मोठी आर्थिक उलाढाल झाली असल्याचा आरोपही साने यांनी केला आहे.

या गुन्ह्यातील ७ आरोपी सापडलेले असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कबुली मिळाली नाही. गुन्हा घडतेवेळी किंवा त्यांच्या पाठीमागील ६ महीन्यापुर्वी त्या आरोपींनी कोणत्या व्यक्तीशी संपर्क साधला किंवा मध्यस्ती इतर कोणत्या एजंटव्दारे संपर्क साधला, याबाबत सायबर सेल कडुन पोलीस आयुक्तांनी स्वत: लक्ष घालुन हल्यातील मुख्य आरोपी व सुत्रधार कोण आहेत याबाबत सत्य परीस्थिती उघडकीस आणावी. या गुन्ह्यातील आरोपींची साने यांनी स्वत: खाजगीरित्या चौकशी केली. त्यात अशी माहीती समोर आली की, या हल्यामागे पांडुरंग बाळासाहेब साने यांनी दत्ता साने यांच्या हत्येची सुपारी रावण टोळीतील दिनेश रेणवा याला दिली होती. दिनेश रेणवा हा पांडुरंग साने यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. त्याचे पुरावे पोलीस आयुक्तांकडे दिले आहेत.

या हल्ल्यामागे भोसरी विधानसभेचे आमदार सुध्दा सामील आहेत. तसेच त्यांचे बगलबच्चे यांच्याशी संबंधित असलेल्या गुन्हेगारांमार्फत हा कट रचण्यात आला आहे, अशी विश्वसनीय बातमी साने यांना सुत्रांकडुन मिळालेली आहे. या दोन लोकांवर साने यांचा शंभर टक्के संशय आहे. ते त्यांचे राजकीय शत्रु आहेत. विरोधी पक्षनेते असताना महेश लांडगेंची अनेक प्रकरणे दत्ता साने यांनी मिडीयाच्या माध्यमातुन उजेडात आणली होती. त्यावेळेस राज्यात भाजपाचे सरकार होते. देवेंद्र फडणवीस यांचेकडे गृहखाते होते. त्याचा पुरेपुर फायदा घेवुन तपासाची दिशा बदलण्यात आली होती असा गंभीर आरोप दत्ता साने यांनी केला आहे.

त्या हल्ल्यातील आरोप मोकळे फिरत आहेत. त्यामुळे दत्ता साने यांच्या जीवास अद्यापही धोका आहे. अशा परिस्थीतीत मुख्य सुत्रधार किंवा ज्यांनी सुपारी दिली त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही, आणि उदया त्यांनी कायदा हातात घेवुन जर काही बरे वाईट केले. तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री, गृहखाते व पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांची राहील. म्हणूनच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा. तसेच या हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यावी. अन्यथा २ मार्चपासून कुटूंबासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे.