शास्तीकर माफीचे आश्वासन म्हणजे निव्वळ ‘गाजर’ : साने 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – शास्तीकर माफीचे निव्वळ ‘गाजर’ दाखवले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी शास्तीकर माफीचे आश्‍वासन सलग तिसर्‍यांदा दिले आहे. ते हवेत विरून जाऊ नये. यंदा ते पूर्ण न झाल्यास त्यांना शहरात पाऊल ठेवू दिले जाणार नसल्याचा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे.

भाजपचे पदाधिकारी शास्ती हे राष्ट्रवादीचे पाप असल्याची टीका करीत असल्याचा धागा पकडून साने म्हणाले की, विधानसभा अधिवेशात ज्यावेळी हा निर्णय घेण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार शहरात फिरत होते. आता, ते आमदार भाजपमध्ये आहेत. त्यामुळे ते पाप आता भाजपचे झाले असून, त्यांनी फेडावे, असा पलटवार त्यांनी केला.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करा : महापौर जाधव 

साने म्हणाले की, पालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री तब्बल 3 वेळा शहरात येऊन गेले. त्यांनी शास्तीकर माफी व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे आश्‍वासन देत तो सोडविल्याचा यापूर्वी दावा केला. भाजपच्या दोन्ही आमदारांनी शहरभर पेढे वाटून फटाके फोडले. स्वत:ची पाठ थोपटून घेतली. आता त्या आमदारांनी शास्तीकर माफ करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना चिंचवडच्या कार्यक्रम केली. त्यांची किव येत असून, शास्तीकर माफीचे निव्वळ ‘गाजर’ असल्याचे स्पष्ट होते.

केवळ 600 चौरस फूट घरांना शास्तीकर माफ करून भाजपच्या दोन्ही आमदारांनी त्यांचे बगलबच्चे आणि बांधकाम व्यावसायिकांना अभय देण्याचा स्वार्थी निर्णय घेतला आहे, असा आरोपही त्यांनी केला. शास्तिकर 100 टक्के माफ करण्यात यावा अशी मागणीही साने यांनी केली आहे.