चंदनाची झाडे चोरणार्‍या टोळीला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – चंदनाची झाडे चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला दत्तवाडी पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून तबल ५० हजार रुपयांचे चंदनाची झाडे जप्त केली आहेत.

अविनाश संजय ठोंबरे (वय २१, रा. लोणी भापकर, ता. बारामती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अतुल लिमये (वय ५८, रा. सहकारनगर दोन) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर येथील राजेंद्र सोसायटी समोर असलेले चंदनाची झाडे आरोपी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास तोडत होते. फिर्यादी यांना काही तरी आवाज आल्याने ते बाहेर आले. त्याना पाहून चोरटे पळाले. त्यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या रात्र गस्तीवरील पथकाला कळविले. त्यानुसार उपनिरीक्षक सुर्यकांत सपकाळे, कर्मचारी विशाल ठोंबरे, सतीश भारती, अमोल दणके यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पथकाने घटनास्थळी असलेल्या झुडपात आरोपींचा शोध घेतला असता त्यांना ठोंबरे दिसला. तो पळून जाऊ लागला असता त्याला पकडण्यात आले. त्याच्याजवळी गोणीमध्ये ५० हजार रुपये किंमतीचे चार चंदनाच्या झाडाचे तुकडे आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी झाडे तोडल्याचे सांगितले. या आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास केला जात आहे.