दारु आणून न दिल्याने सुनेला किटकनाशक पाजून खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दारु आणून न दिल्याने सुनेला मारहाण करुन तिला किटक नाशक जबरदस्तीने पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील गोलेगाव येथे घडला. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी तिचे सासरे, सासू, नणंद अशा चार जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सासरे बाळू बाबु चौधरी, सासू चंपा बाबु चौधरी, नणंद सुरेखा बबन वाघोले (रा. दारुंबरे, ता. मावळ) आणि नणंद रेखा दादा गव्हाणे (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरुर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अनिता संतोष चौधरी (वय ३२, रा. गोलेगाव, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १५ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात घडला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अनिता चौधरी यांचे पतीचे संतोष यांचे २०१२ मध्ये निधन झाले आहे. त्यानंतर आता तिने सासुरवाडीला राहु नये, असा या सर्वांचा प्रयत्न आहे. अनिता चौधरी यांच्या सासऱ्यांना दारूचे व्यसन आहे. त्यांना अनिता यांनी दारू आणून न दिल्याने या चौघांनी मिळून अनिता यांना हाताने, काठीने मारहाण केली. त्यांना घमदाटी करुन घरातील सदाबहार किटकनाशक औषध जबरदस्तीने पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. किटकनाशक पिले गेल्याने अनिता बेशुद्ध पडली. तिच्यावर गेले काही दिवस उपचार करण्यात येत होते.
त्यानंतर आता त्यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.