धक्कादायक ! तंत्र-मंत्रच्या जाळ्यात अडकली सून, सिद्धीसाठी दिला दिव्यांग सासऱ्याचा बळी

लखनौ : उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे तंत्र-मंत्राच्या जाळ्यात एक सून अडकली. सिद्धीसाठी तिने सासऱ्याचा बळी दिला. पोलिसांनी दिव्यांग वृद्धाच्या हत्येप्रकरणी सूनेला मुख्य आरोपी म्हणून अटक केली. पण सूनेनेच अशाप्रकारचे कृत्य केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कौशांबी येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एका दिव्यांग वृद्धाची हत्या करण्यात आली होती. अकराबाद गौहाली गावात रात्री घराच्या बाहेर दिव्यांग वृद्ध भगवान दास झोपले होते. तेव्हा त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. जेव्हा ही घटना घडली तेव्हा घरातील इतर लोक जवळच्याच गावात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. जेव्हा घरातील सर्वजण घरी परतले तेव्हा त्यांना वृद्धाची हत्या झाल्याचे पाहून धक्काच बसला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी तपास सुरु केला. तेव्हा त्यांना घटनास्थळावर पुजेचे साहित्य दिसले. त्यामुळे पोलिसांना त्या वृद्धाच्या सूनेवर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी सूनेची कसून चौकशी केली. तेव्हा तिने या हत्येची कबुली दिली.

माझ्या अंगात देवी येते; सूनेचा दावा

पोलिसांनी याप्रकरणी सूनेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तिने माझ्या अंगात देवी येते, असा दावा केला. देवीच्या आदेशामुळेच मी हे कृत्य केले, असेही तिने सांगितले.

सासऱ्यामुळे बाधा

गेल्या 3 वर्षांपासून सासरे लकवाग्रस्त होते. त्यामुळे महिलेला त्यांची सेवा करावी लागत होती. महिलेच्या तंत्र-मंत्रात बाधा येत होती. म्हणून हत्येसारखे टोकाचे पाऊल तिने उचलले.