‘भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीने नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्तीने ट्विट केले की, भारत हा मुस्लिमांना स्थान नसलेला देश आहे.

जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटवल्यापासून मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची मुलगी इल्तिजा ही पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्या पक्षाची भूमिका मांडताना दिसते.


भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार हे मुस्लिमांच्या विरोधात आहे हे वारंवार तिने स्पष्ट केले असून कलम ३७० हटविल्यानंतर त्यांनी मुस्लिमांसंबंधी केंद्र सरकार हेतू स्पष्ट आणि धोकादायक असल्याचे ट्विट केले होते. मेहबुबा मुफ्ती आणि इल्तिजा यांनी केंद्र सरकारवर नेहमीच निशाणा साधला आहे. कलम ३७० हटविल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, तसेच अजून दोन मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ते म्हणजे ओमर अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्ला होय.

नागरिकत्व कायदा दुरुस्ती म्हणजे काय?
नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकाद्वारे पाकिस्तान व बांगलादेशातून आलेल्या तसेच शेजारच्या इतर देशांतून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशीधर्मीयांना भारताचे नागरिकत्व लवकरात लवकर देण्यासंबंधित म्हणजेच १ ते ६ वर्षांत त्यांना नागरिकत्व मिळावे अशी तरतूद यात आहे. १९५५ च्या कायद्यानुसार यासाठी त्यांना ११ वर्षे भारतात राहणे हे बंधनकारक असते.

विरोध कोण करत आहे?
नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकाला नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) विरोध दर्शविला आहे. तसेच गेल्या ३० वर्षांपासूनची भाजपबरोबरची जुनी मैत्री तोडणारी शिवसेनाही या विधेयकाला विरोध करणार असल्यामुळे राज्यसभेत सरकारसमोरील आव्हान वाढले आहे. या विरोधामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

विधेयक जाणार संसदेत
नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली असून या विधेयकाचा संसदेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभेत संख्याबळाच्या आधारावर मंजुरी मिळविणे सरकारसाठी सोपे असले तरी, राज्यसभेत साऱ्या विरोधकांची यावर एकजूट असून सरकार येथे अल्पमतात आहे. ही विधेयके मंजूर करताना गृहमंत्री अमित शहा यांनी दाखविलेले कौशल्य ते पुन्हा दाखविणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. आता पुढे कोणता निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.