Pune News : कौतुकास्पद ! रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील कॉलेजची 2 कोटींची ‘स्कॉलरशिप’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुण्यात रिक्षा चालवणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या मुलीला अमेरिकेतील एका कॉलजने 2 कोटी रुपयांची दिली आहे. ऋतुजा भोईटे असे या मुलीचे नाव असून ती कोंढवा (खुर्द) येथे आपल्या कुटुंबासमवेत राहते. तिचे वडील पुण्यात रिक्षा चालतात. ऋतुजाने जिद्दीने आणि कष्टाने हे यश मिळवले असल्याचे तिचे आई-वडील सांगतात.
ऋतुजाचे आठवी पर्यंतचे शिक्षण कोंढव्यातील महापालिकेच्या शाळेत झाले. त्यानंतरचे दहावीपर्यंतचे शिक्षण अवसरा विद्यालय लवळे, पौड येथे झाले. पुढील दोन वर्षाच्या शिक्षणासाठी तिला युनायटेड वर्ल्ड स्कूल थायलंड येथे शिकण्यासाठी पन्नास लाखाची शिष्यवृत्ती मिळाली. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ऋतुजाने आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर आता तिला थेट अमेरिकेतील लेक फॉरेस्ट कॉलेजकडून दोन कोटी रुपयांची स्कॉलरशीप मिळाली आहे. आता ती थायलंड येथून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेली आहे. पुढील चार ते पाच वर्षे तिला प्रतिवर्षी 65 हजार डॉलर म्हणजेच 50 लाख रुपये मिळणार आहेत. आर्थिक व्यवस्थापन या विषयात ती पुढील पदवी शिक्षण घेणार असून या विषयातील शिक्षणासाठी तिला ही स्कॉलरशीप मिळाली आहे.

ऋतुजाचे वडील अरुण भोईटे हे रिक्षा चालवतात तर आई नंदा भोईटे या कोंढवा (खु) येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. तिला आणखी दोन बहिणी आणि एक  भाऊ आहे. ऋतुजाला शिष्यवृत्ती मिळाल्याने तिच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिच्या यशात मामा संतोष खोडवे यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगितले. पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेतील हॉवर्ड युनिव्हर्सिटीत करण्याची इच्छा असल्याचे तिने बोलून दाखवले.