राष्ट्रवादी काँग्रेसने आता दौंडचा उमेदवार बदलण्याची गरज : विकास ताकवणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येत्या विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसने आता दौंड तालुक्यातील उमेदवार बदलण्याची गरज असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यमान आमदारांना शह देण्यासाठी मी नक्कीच सक्षम आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे इच्छुक उमेदवार आणि प्रसिद्ध उद्योगपती विकासआबा ताकवणे यांनी व्यक्त केले ते पारगाव येथील एका समारंभामध्ये पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात बोलत होते.

पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व अध्यक्ष शरद पवार साहेब यांनीच आता आपण नवीन लोकांना संधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आम्ही नऊ जणांनी इच्छुक उमेदवारीचे अर्ज दाखल केले आहेत आणि मला निश्चित उमेदवारी मिळेल अशी आशा आहे असे त्यांनी सांगितले. स्वतः विषयी माहिती देताना त्यांनी मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून वर आलेलो असल्याने मला गरिबी, शेती, शेतकरी या विषयांची चांगली जाण आहे. तसेच मी गेली पंचवीस वर्षे औद्योगिक विभागामध्ये काम करत असल्याने औद्योगिक बाबींचा मला चांगला अनुभव आहे. त्यामुळे मी शेतकरी, युवकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळू शकतो तसेच तालुक्यातील विविध विकासकामे निश्चितच चांगल्या प्रकारे करू शकतो असे सांगितले.

शेवटी बोलताना त्यांनी कुल आणि थोरात या दोन्ही आजी-माजी आमदारांच्या काळामध्ये तालुक्याचा विकास झाला नसून जर मला उमेदवारी मिळाली तर आपण निश्चित निवडून येऊ आणि दौंड तालुक्याचा चेहरा मोहराच बदलू टाकू असा विश्वास व्यक्त केला आहे. विकास ताकवणे हे मूळ दौंड तालुक्यातील पारगाव येथील रहिवासी असून त्यांनी पिंपरी चिंचवड परिसरामध्ये स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर मोठ्या इंडस्ट्रीयल कंपन्या उभारत प्रसिद्ध उद्योगपती बनले. त्यांच्या पत्नी नंदा ताकवणे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या होत्या. विकास ताकवणे यांना दौंड तालुक्यामध्ये मानणारा मोठा वर्ग असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आता नवीन चेहऱ्यांना संधी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –