शिक्षिकेच्या गळ्यातील 2.5 तोळ्याचे गंठण हिसकावून चोरटे फरार, केडगावमधील धक्कादायक घटना

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावण्याच्या घटना घडू लागल्या असून रविवार, दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याचा सुमारास दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी एका शिक्षिकेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे गंठण जबरदस्तीने हिसकावून तोडून नेले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे केडगाव परिसरात असणाऱ्या महिलांमध्येही मोठी घबराट पसरली आहे.

आशा अनिल बाप्ते (वय ५६ वर्षे, रा. सरदार नगर, केडगाव स्टेशन) असे या शिक्षिकेचे नाव असून त्या गेली २५ वर्षांपासून केडगांव येथील जवाहरलाल विद्यालय केडगांव येथे शिक्षीका म्हणून नोकरी करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रविवार, दिनांक २९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११.४५ वा.च्या सुमारास आशा बाप्ते या घरामध्ये असलेला कचरा बाहेर टाकण्यासाठी गेल्या होत्या. कचरा टाकून त्या घराकडे जात असताना दोन अनोळखी इसम मोटार सायकलवर बसून त्यांच्या समोर आले. त्यांच्यातील मोटार सायकलवर पाठीमागे बसलेला इसम मोटार सायकलवरून उतरून त्यांच्याजवळ येऊन ‘तुम्हाला पत्रिका द्यायची आहे व आमच्यातील आणखी एकजण पलिकडील लाईनला पत्रिका वाटुन येत आहे व आम्हाला तुमचे गळ्यातील सोन्याचे दागिण्यासारखे दागिने करायचे आहेत असे म्हणून त्याने अचानकपणे त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने गळ्यातुन हिसका मारत तोडले आणि पळत जावून रोडवर मोटार सायकल घेवून थांबलेल्या इसमाच्या पाठीमागे बसुन दोघेही मोटारसायकलवर पळून गेले आहेत.

मोटारसायकलवर पुढे बसलेल्या चोरट्याचे वय अंदाजे ३४ ते ३८ वर्षे असून तो अंगाने जाडजुड, रंगाने काळा, अंगात काळे रंगाची जरकिन, पॅन्ट असा त्याचा पेहराव आहे. तर गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेलेल्या इसमाचे वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे असून तो रंगाने गोरापान, अंगात टी शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट असा पेहराव होता. घटनेचा अधिक तपास केडगाव पोलीस चौकीचे हवालदार जितेंद्र पानसरे करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like