जुन्या वादातून शिक्षकास मारहाण, पोलीस कर्मचारी आणि त्याच्या साथीदारावर FIR दाखल

दौंड :  पोलीसनामा ऑनलाइन  –   दौंड तालुक्यातील केडगाव(गावठाण) येथे जुन्या वादातून एका शिक्षकास काठी आणि लाथा, बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याबाबत शिक्षक शामराव बाबुराव गोरगल ( रा.केडगांव गावठाण ता.दौड जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी यवत पोलिसांनी शिक्षकास मारहाण करणाऱ्या आणि पेशाने पोलीस कर्मचारी असणाऱ्या दत्तात्रय महादेव गायकवाड आणि त्याचा साथीदार प्रकाश शिवाजी शेलार अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत यवतचे ठाणे अंमलदार पोह.मारकड यांनी याबाबत माहिती देताना फिर्यादी शिक्षक शामराव गोरगल आणि आरोपी दत्तात्रय महादेव गायकवाड यांच्यामध्ये एक वर्षापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तेव्हापासून ते एक दुसऱ्याशी बोलत नव्हते. काल दि.५ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शामराव गोरगल हे एकटेच त्यांच्या मोटार सायकलवरुन फिल्टरचे पाणी आणण्यासाठी जात असताना समोर दत्तात्रय महादेव गायकवाड आणि त्यांचा साथीदार प्रकाश शिवाजी शेलार असे उभे होते.

त्यावेळी पेशाने पोलीस कर्मचारी असलेल्या दत्तात्रय गायकवाड याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून पेशाने शिक्षक असलेल्या शामराव गोरगल यांना ये मास्तरड्या, तुझा माज मोडतो, तुला माझा हिसका दाखवतो असे म्हणत अंगावर धावत येवुन शिवीगाळ, दमदाटी करून हाताने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्याच्या सोबत असलेला प्रकाश शिवाजी शेलार याने त्याचे हातातील लाकडी काठीने या शिक्षकाच्या पाठीवर, दोन्ही पायाचे मांडीवर तसेच डावे बाजूच्या कानावर मारहाण केली आणि जिवेमारण्याची धमकी दिली त्यावरून यवत पोलिसांनी या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तर प्रकाश शिवाजी शेलार याने शिक्षक शाम गोरगल यांच्याविरोधात लाथा, बुक्क्या व काठीने मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.