गणेश शेलार यांची खासगी सावकारीला कंटाळून आत्महत्या ? केडगावमध्ये चर्चेला उधाण

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव येथे आज शनिवार दि.७ मार्च रोजी दुपारी दीड वाजता जवाहरलाल विद्यालयाचे सिनियर क्लार्क गणेश शेलार यांचा रेल्वेच्या धडकेनेे मृत्यू झाला. मात्र झालेला मृत्यू हा खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून केलेली आत्महत्या असल्याची मोठी चर्चा सध्या केडगाव परिसरामध्ये सुरू आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून मृत गणेश शेलार यांनी नेमके कोणत्या आणि किती खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते, त्यांना फोन करून आणि भेटून कोणते सावकार त्रास देत होते याचा उलगडा होणे गरजेचे बनले आहे.

राज्य शासनाने खाजगी साावकारांवर आपला फार्स आवळला असला तरी केडगाव परिसरामध्ये मात्र आजही मोठ्या प्रमाणावर गुप्तपणे खाजगी सावकारी सुरू असून खाजगी सावकारांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. गरजवंत लोकांना आपल्या जाळ्यात ओढून हे खाजगी सावकार एक लाख रुपयांना दहा टक्के दराने महिन्याला दहा हजार रुपये व्याज आकारतात. शिवाय व्याजाने पैसे देताना हे लोक त्या व्यक्तीचे घर, जमीन किंवा कुठलीही एक मालमत्ता गहाण ठेऊन घेतात. ही मालमत्ता गहाण ठेवताना रीतसर तसा खरेदी खताचा कागद ही करून घेत असल्याची धक्कादायक बाब आता नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत आहे. दर महिन्याला दहा हजार रुपये व्याज घेऊन घेतलेल्या एक लाख रुपयांच्या मुद्दलीची रक्कम व्याजाच्या स्वरूपात दहा महिन्यातच या सावकारांना मिळून जाते मात्र गरजवंतांची खरी पिळवणूक येथूनच सुरू होते. ही पिळवणूक एकतर त्या व्याजाने पैसे घेणाऱ्या व्यक्तीची सर्व मालमत्ता दुसऱ्याला विकून किंवा सावकाराने स्वतःच्या नावावर करून थांबते किंवा त्या व्यक्तीच्या आत्महत्येवर या गोष्टींवर पडदा पडतो. त्यामुळे आता पोलिसांनीच या घटनांचा गुप्तपणे तपास करून यातील आरोपींना शोधून शासन करणे गरजेचे बनले आहे तरच या गोष्टी थांबू शकतात अशी मागणी जोर धरत आहे.