दौंड : मुस्लिम महिलेच्या प्रसूतीसाठी बस थेट रुग्णालयात; चालक, प्रवासी आणि डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – देशात सध्या धर्म आणि जातीयवादावरून रणकंदन माजले असताना दौंड तालुक्यामध्ये मात्र सर्व जातीधर्माच्या लोकांत एक आगळी वेगळी एकता पहायला मिळाली आहे.

तर झाले असे की पुण्याहुन उस्मानाबादकडे एक एस टी बस जात होती. एस टी बस दौंड तालुक्यातील पाटस टोल नाका पास करून पुढे निघताच बसमधील एका गर्भवती महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. पहाटेची वेळ असल्याने आता नेमकं काय करावं हे कुणालाच समजत नव्हते. मात्र बसमधील काही प्रवाशांनी आणि बस चालकाने निर्णय घेत बस थेट कुरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली. या आरोग्य केंद्रामध्ये महिलेची प्रसूती सुखरूपपणे पार पडली. बाळ-बाळंतीण सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगताच सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

निलोफर शफीक मोगल असे या मुस्लिम महिलेचे नाव असून त्या कुर्ला येथील रहिवासी असून त्या आपले पती शफीक यांच्यासह पुण्यातून उस्मानाबादकडे बसने प्रवास करीत होत्या. वैद्यकीय अधिकारी राजेश पाखरे यांनी आरोग्य सेविका पुष्पा गायकवाड यांच्या मदतीने संबंधित प्रसूती केली. यावेळी महिलेची पती आणि नातेवाईकांनी बसचालकासह प्रवासी, डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानत आजही आपल्या देशात विविध जाती धर्मातील लोक वाईट वेळेत एक दुसऱ्यांची कशी मदत करतात हे या प्रकरणावरून पुन्हा समोर आल्याचे सांगितले.