तर ‛कुल’ गटातील कार्यकर्ते उघडपणे ‛थोरात’ गटाचे काम करणार, ‘थोरात’ गट आव्हान स्वीकारणार का ?

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील कुल आणि थोरात हे दोन गट संपूर्ण जिल्ह्याला चांगलेच परिचित असून या दोन गटांमुळे एके काळी राज्याचे मंत्रिमंडळही तलवार आणि काठी या वाक्यरचनांनी चांगलेच प्रकाश झोतात आले होते हे अजूनही दौंडकरांच्या स्मरणात आहे.

सत्ताधारी गटाकडून कोणतीही केंद्र किंवा राज्यस्तरीय योजना या तालुक्यात आणली गेली की ती कशी फोल आहे हे ठरविण्यासाठी सोशल मीडियावर जणू चढाओढच सुरू होते. असाच एक किस्सा नुकताच घडला असून त्यामुळे तालुक्यतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

तर झाले असे की पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए च्या कक्षेमध्ये येणाऱ्या गावांना ‛प्रधानमंत्री आवास योजनेच्या’ माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारकडून सुमारे अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची योजना निवडक तालुक्यांप्रमाणेच दौंड तालुक्यामध्ये ही आली आहे. यागावांमध्ये दौंड तालुक्यातील सुमारे ५१ गावे येत असल्याने या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी योजना येताच केले होते.

मात्र या योजनेची थोरात गटातील काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवत १५ लाख रुपयांसारखेच तालुक्यात अडीच लाखांचे गाजर दाखवण्यात येत असल्याची टिका विविध सोशल माध्यमांतून सुरू केली. परंतु कुल गटातील कार्यकर्त्यांनी मात्र आमदारांनी स्वतः आवाहन केले आहे त्यामुळे ही योजना नक्कीच राबवली जाणार असून सर्वांनी लवकर फॉर्म भरून द्यावेत असे आवाहन केले त्यामुळे द्विधा मानस्थितीमध्ये असणाऱ्या नागरिकांनी कुल यांच्या अवाहनावर विश्वास ठेवत चांगला प्रतिसाद दिला आणि फॉर्म सबमिट केले काहींनी मात्र सोशल मीडियावरील विरोधकांच्या त्या ‛हे गाजर आहे काही फायदा नाही’ या पोस्ट वाचून फॉर्म भरण्याची मनस्थिती असतानाही फॉर्म भरलेच नाही. आणि अचानक दोन दिवसांपूर्वी ज्यांनी-ज्यांनी आवास योजनेअंतर्गत अर्ज केले होते त्यांची नावे यादीत नावे येऊन तालुक्यातील विविध गावांमध्ये पीएमआरडीए च्या कर्मचाऱ्यांचा सर्वेही सुरू झाला. त्यामुळे कुल गटातील कार्यकर्त्यांचा आनंद तर द्विगुणित झालाच पण आपल्या नेत्यांनी केलेल्या आव्हानामध्ये किती सत्यता होती हेही जाहीर केले. आणि तेवढ्यात मात्र कुल गटातील एका कार्यकर्त्याने थोरात गटाच्या त्या कार्यकर्त्याचा 15 दिवसांपूर्वीचा तो जपून ठेवलेला स्क्रिनशॉट त्यांच्या ग्रुपवर व्हायरल करत त्या आव्हानाची आठवण करून दिली.

ज्यामध्ये त्या कार्यकर्त्याने आवाहन केले होते की “१५ लाखा सारखेच सध्या तालुक्यात अडीच लाखांचे गाजर दाखवले जात आहे” हा मजकूर लिहिलेला होता. हे पाहून इतक्या दिवस शांत बसलेल्या कुल गटातील कार्यकर्त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी त्या कार्यकर्त्याला आणि त्यांच्या संपूर्ण गटालाच जर आमची योजना फसवी असेल तर आम्ही खुलेआम तुमच्या नेत्याचे काम करू पण जर आमची योजना खरी असेल तर तुम्ही कुल गटाचे काम करणार का ? असे आव्हानच देऊन टाकले आहे. कुल गटाच्या आव्हानावर आता थोरात गट खरेच आव्हान स्वीकारणार का ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

कुल गटातील कार्यकर्त्यांच्या या आव्हानामुळे दिवस रात्र सोशल मीडियावर ऑनलाइन असणारे कार्यकर्ते मात्र अचानक ऑफलाईन झालेले दिसून आले. ज्याने कुठलीही माहिती न घेता ही योजना म्हणजे फक्त गाजर आहे ही पोस्ट केली होती तो कुठे गायब झाला आहे याचा शोध सध्या विविध सोशल माध्यमांवर कुल गट घेत आहे.