दौंडकरांनी अनुभवला ‘3 idiots’ मधील प्रसूतीचा थरार ! रस्त्यावरील वाहनातच यशस्वी ‘डिलिव्हरी’, माता आणि बाळ ‘सुखरूप’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – तुम्ही अमिर खानचा 3 इडियट्स चित्रपट पाहिलाच असेल त्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने सर्व इंजिनियर मुले ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका गरोदर महिलेची प्रसूती करतात तसाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील वायरलेस फाटा येथे सोमवारी सकाळी एका महिलेसोबत घडला आहे.

सौ. ऐश्वर्या जगताप असे या 26 वर्षीय महिलेचे नाव असून त्या दौंड तालुक्यातील पाटस येथील रहिवासी आहेत. तर झाले पाटस ऐश्वर्या जगताप या मारुती ओमनी गाडीतून दौंडला जात असताना त्यांना अचानक प्रस्तुती कळा सुरु झाल्या. गिरीम येथील वायरलेस फाटा येईपर्यंत पोटातील बाळाचे डोके बाहेर येवून ते बाळ अर्धवट अवस्थेमध्येच आईच्या पोटात अडकले आणि आईच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला. यावेळी ही माता वेदनेने मोठमोठ्याने ओरडत होती. या वेळी तिच्या सोबत असलेले तिचे नातेवाईकही खूपच घाबरलेले होते. यावेळी त्यांनी वायरलेस फाटा येथे असणारे लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. संदिप गावडे यांना बोलावून बाळाला व आईला वाचवण्याची विनंती करू लागले.

या परिस्थितीमध्ये पेशंट तसेच दौंडपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला तर वाटेतच आई व बाळ य़ा दोघांच्या जीवास धोखा निर्माण होईल हे सर्वांनाच कळून चुकले होते त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखत डॉ.संदिप गावडे यांनी क्षणाचाही विलंब न करता रस्त्यावर असलेल्या त्या गाडीमध्येच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आणि सोबत उपकरणे नसताना एका सिस्टरच्या मदतीने त्या मातेची डिलिवरि करुन ते बाळ सुखरूप बाहेर काढले. परंतु त्या बाळाच्या मानेभोवती नाळेचा वेढा असल्यामूळे व प्रवासात बाळ आईच्या पोटात अर्धवट अवस्थेत खूप वेळ अडकून राहिल्यामूळे बाळाच्या नाका तोंडात शी गेली होती. त्यामुळे बाळ बाहेर आले तरी बेशुद्ध अवस्थेमध्येच होते. अश्या वेळी बाळ लगेच रडणे खूप आवश्यक असते नाहीतर बाळाच्या जीवास धोका होवू शकतो. पण अनेक उपाय करूनही बाळ रडत नव्हते त्यामुळे डॉक्टरांची मोठी कसरत सुरू झाली होती.

 

सोबत काहीच उपकरणे नसताना ते बाळ वाचवण्याची धडपड डॉक्टर करत होते आणि शेवटी तोंडानेच क्रूत्रिम श्वासोच्छवास देवुन, खूप वेळ कार्डियाक मसाज केल्यानंतर बऱ्याच वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि डॉक्टरांसोबतच, नातेवाईक व रस्त्यावर उपस्थित सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर बाळाला व्यवस्थित स्वच्छ करुन बाळ कापडात गुंडाळून बाळाला आईच्या हातात देण्यात आले. यावेळी डॉक्टर गावडे यांनी या मातेच्या नातेवाईकांकडून कसलाही मोबदला न घेता आई व बाळ पुढील उपचारासाठी दौंड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. यावेळी जाताना त्या मातेच्या व नातेवाईक यांच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांनी दिलेला आशीर्वादच डॉक्टरांसाठी खूप मोठा आनंद देऊन गेला होता त्याची किंमत दुसऱ्या कशाबरोबरच होवू शकत नाही असे मनोगत डॉक्टर संदीप गावडे यांनी व्यक्त करत अतिशय कठीण परिस्थिती मध्ये त्या बाळाचे व आईचे प्राण वाचवल्याचे खूप मोठे आत्मिक समाधान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com