१३ वर्षांपासून फरार असलेला कैदी दौंड पोलिसांनी पकडला

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – १३ वर्षांपासून फरार असलेल्या कैद्यास दौंड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2003 मध्ये दरोडा व खंडणीच्या गुन्ह्यांमधील आरोपी मनोज साहेबराव काळे (वय 42 वर्षे) राहणार पिलीव तालुका, माळशिरस, जिल्हा सोलापूर) याला अटक करण्यात आली होती. त्याच्यासोबत रामदास भानुदास पवार, बाळू चंद्र पवार, संतोष अंकुश मोहिते, एकनाथ अर्जुन मोहिते ,यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. या सर्वांना शिवाजी नगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु बाकीचे आरोपी सजा भोगत असताना हा आरोपी २००६ साली पॅरोल रजेवर आला होता. तेव्हापासून तो परत जेलमध्ये गेला नाही. सदर आरोपीचा तेव्हापासून पोलीस शोध घेत होते.

सदर आरोपीस न्यायालयाने फरारी घोषित करून त्याच्यावर माळशिरस पोलिस ठाण्यात १९/१३ कलम २२४ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद आहे. तेव्हापासून माळशिरस पोलिस सुद्धा त्याचा शोध घेत होते. सदर चा आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवून सध्या माळेगाव, तालुका बारामती व काही दिवस त्याचे वास्तव्य सरस्वतीनगर इंदापूर याठिकाणी सुद्धा होते. सदर आरोपी दौंड न्यायालय परिसरात आल्याची माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाल्याने त्यांनी त्यास तात्काळ अटक करण्याची कारवाई केली.

या कारवाईमध्ये दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस हवालदार आसिफ शेख, पोलीस शिपाई गुंजाळ, पोलीस शिपाई देवकाते यांनी भाग घेतला. आरोपी याला माळशिरस पोलिसांच्या ताब्यात देऊन जेलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली.

Visit : Policenama.com