पुणे / दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – Daund Pune Crime News | गोपाळवाडी येथील सरपंचवस्ती जवळ बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या देशी-विदेशी दारूच्या अड्ड्यावर छापा मारून गुरुवार (दि.१३) पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान सेवानिवृत्त पोलीसच दारू विक्री करीत असल्याने खळबळ उडाली आहे.
शिवाजी संभाजी जाधव (रा. सरपंच वस्ती दौंड) देशी-विदेशी दारूची बेकायदेशीरपणे विक्री करीत असल्याचे आढळून आले. यावेळी देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आले असल्याची माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली आहे..
पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांना खबरी मार्फत माहिती मिळाली की, सरपंच वस्ती परिसरात बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. खबर मिळताच घोडके यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना दिली. गोपाळ पवार यांनी तत्काळ कारवाईची सूचना केली.
युवराज घोडके यांनी आपल्या पथकासह सदर ठिकाणी छापा मारला असता शिवाजी संभाजी जाधव (रा. सरपंच वस्ती, दौंड) देशी- विदेशी दारूची बेकायदेशीरपणे विक्री करीत होता. दरम्यान पोलीस पथकाने या अड्ड्यावरून दारूच्या बाटल्या व रोख रक्कम असा एकूण १५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.