दौंडचे जवान संतोष पळसकरांना लेह लदाखमध्ये ‘वीरमरण’ !

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख)- जम्मू काश्मीरच्या लेह लदाख येथे आज सोमवार दि.२१ रोजी आपले कर्तव्य बजावत असताना सुभेदार संतोष प्रल्हाद पळसकर यांना वीरमरण आले आहे. ते दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथील रहिवासी होते.

जवान संतोष उर्फ बाळासो पळसकर हे सध्या चामुथांग लेह येथे ६७ एफ.डी रेजिमेंट मध्ये आपले कर्तव्य बजावत होते. ते एक कामगिरी बजावत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याने त्यांना वीरमरण आले अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. संतोष हे आई वडिलांना एकुलते एक होते. त्यांच्या पश्चात आई , वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. आई आणि वडील गावाकडे तर पत्नी व मुले पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे पार्थिव उद्या देऊळगाव राजे येथे येईल व त्यानंतर उद्या मंगळवार दि.२२ रोजी संध्याकाळी अंत्यसंस्कार होतील अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली.