पुस्तक विकलं जावं म्हणून ‘खोट’ बोलतायत मुंबईचे Ex CP मारिया, D कंपनीला मिळाली नव्हती कसाबची ‘सुपारी’, छोटा शकीलनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबबद्दल मोठा खुलासा केला आहे. मारिया यांनी म्हटले की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीला अजमल कसाबला पोलीस कोठडीत मारण्याची सुपारी मिळाली होती. दहशतवाद्याचा तपशील माध्यमांपर्यंत पोहोचू नये, यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते. मात्र, दाऊदच्या निकटवर्ती छोटा शकीलने मारिया यांचे हे दावे फेटाळून लावले आहेत.

छोटा शकीलने राकेश मारिया यांच्या ‘लेट मी से इट इट’ या पुस्तकात दाऊद इब्राहिमशी संबंधित दाव्यांना खोटे असल्याचे म्हंटले आहे. छोटा शकील म्हणाला की, पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी आणि विक्री करण्यासाठी वाट्टेल ती खोटी माहिती दिली आहे. यासाठी ते दाऊद इब्राहिमच्या नावाचा वापर करत आहेत. खरे तर डी गँगचा अजमल कसाबशी काही संबंध नाही. कसाबला मारण्याची सुपारी डी गँगला मिळाले नाही. मारिया साहेबांच्या या लबाडीला माझ्याकडे उत्तर नाही. जर त्यांना भाईंचे नाव वापरुन पुस्तकाची जाहिरात करायची असेल तो वेगळा मुद्दा आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन हे खरे असल्याचे बोलले तर विश्वास ठेवण्यासारखे काहीतरी आहे. मात्र, ते असे करणार नाही. ते चुकीच्या दाव्यांसह फक्त पुस्तकाची जाहिरात करत आहेत. यापलीकडे मला काही सांगायचे नाही.

‘भारतात खोट्या गोष्टींचे सत्य सर्वांना ठाऊक आहे’
यावेळी राकेश मारियाला खोटे बोलण्याची काय गरज होती? ते महत्वाच्या पदावर आहेत. असे छोटा शकीलला विचारले असता तो म्हणाला की, ‘आज भारतात कोण खोटे बोलत नाही. वरपासून खालपर्यंत … हे सर्व खोटारडे आहेत. प्रत्येकाला खोट्याचे सत्य माहित असते. त्यात राकेश मारिया यांनी खोटे बोलले तर यात नवीन काय आहे ? तसेच अजमल कसाब हा डी कंपनीचा विषय नव्हता, त्यामुळे आयएसआय किंवा इतर कोणी आम्हाला काय काम देईल?

दरम्यान, 26/11 च्या हल्ल्यावेळी राकेश मारिया मुंबई पोलिस आयुक्त होते. मारिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे, ‘शत्रू (कसाब) जिवंत ठेवणे ही माझी पहिली प्राथमिकता होती. या दहशतवाद्याविरूद्ध लोकांचा रोष व संताप मोठ्या प्रमाणावर होता. मुंबई पोलिस विभागातील अधिकारीही संतापले. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा कसाबला कोणत्याही मार्गाने रस्त्यावरुन हटवण्याच्या प्रक्रियेत होती. कारण कसाब हा मुंबई हल्ल्याचा सर्वात मोठा आणि एकमेव पुरावा होता.

26 नोव्हेंबर 2008  रोजी 10 दहशतवाद्यांनी मुंबईत तीन ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 166 लोक ठार आणि शेकडो जखमी झाले. हल्ल्यातील या 10 दहशतवाद्यांपैकी फक्त एक अजमल कसाब जिवंत पकडला गेला. 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कसाबला फाशी देण्यात आली.