‘कोरोना’मुळं मोस्ट वॉन्टेड ‘डॉन’ दाऊद इब्राहिमचा ‘खात्मा’ ?

कराची : वृत्तसंस्था – अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 मध्ये मुंबई झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सुत्रधार दाऊद इब्राहिम याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर दाऊदवर पाकिस्तानमधील कराचीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे वृत्त यापूर्वीच आले होते. डी कंपनीचा म्होरक्या असलेल्या दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नीला कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप पाकिस्तानकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. दरम्यान, न्यूज एक्स या वृत्तवाहिनीने दाऊद इब्राहिम याचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे.

दाऊद इब्राहिमला कोरोना झाल्याचे वृत्त दाऊदचा भाऊ असिन याने फेटाळून लावले आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, दाऊदचा भाऊ असिन याने एका अज्ञात स्थळावरून फोन करत दाऊदला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. दाऊदसह त्याच्या कुटुंबियांतील कोणत्याही सदस्याला कोरोनाची लागण झालेली नाही, अशी माहिती त्याने दिली आहे. यूएईमधील पंचतारांकित हॉटल्स, पाकिस्तानमधील मोठमोठे बांधकाम प्रकल्प आणि ट्रान्सपोर्ट सेवेची आणि डी कंपनीची प्रमुख जबाबदारी असिन इब्राहिम पाहतो.

दरम्यान, न्यूज एक्स या वृत्तवाहिनीने डॉन दाऊद इब्राहिम याचा कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कराची येथे मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. दाऊद इब्राहिम याचा मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. परंतु अद्याप पाकिसास्तानकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

कोण आहे दाऊद ?
दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. यानंतर पाकिस्तान त्याला संपूर्ण संरक्षण देत आहे. दाऊद पाकिस्तानात असल्याचे पुरावे भारताने पाकिस्तानला वारंवार दिले होते. मात्र, पाकिस्तानने ते कधीच मान्य केलेलं नाही. 1993 च्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद पाकिस्तानात पळून गेला होता. तेव्हापासून भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर असून तो सगळ्यांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरला आहे. यातच आता कोरोनामुळं तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.