नेपाळमधून भारतात नकली सोनं आणि नोटा पाठवत होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाचा खुलासा

पोलिसनामा ऑनलाईन :  कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या अल्ताफ हुसेन अन्सारी याला नेपाळ पोलिसांनी नेपाळ देशाची राजधानी काठमांडू येथून अटक केलीय. नेपाळच्या पर्सा जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाने याबाबत माहिती दिलीय. 2011 मध्ये सुमारे 55 लाख किंमतीची बनावट भारतीय चलन जप्त केल्याप्रकरणी तो फरार होता. पोलिसांच्या चौकशी दरम्यान त्याने बनावट नोटा आणि बनावट सोन्याच्या पुरवठ्यांच्या नेटवर्कची माहिती दिलीय. अल्ताफ हुसेन अन्सारी याने म्हटले आहे की, या काळ्या बाजारात नेपाळमधील पाकिस्तानी दूतावास आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था, आयएसआयची मदत मिळत होते.

याबाबात नेपाळच्या पर्सा जिल्ह्यातील एसपी गंगा पंत यांनी सांगितले की, अल्ताफ हा नेपाळमधील बारा जिल्ह्यातील हरपूरचा रहिवासी असून त्यांनी बिहार सीमेलगत नेपाळी शहर असलेल्या वीरगंज येथे मुक्काम केला होता. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली असून गुप्त ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवून त्याची चौकशी केली जातेय.

नेपाळमध्ये भारतविरोधी घटक अधिक दृढ होताहेत. नेपाळमध्ये दाऊद गँगचे कनेक्शन जुने असून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. चीन हा नेपाळमध्ये भारतविरोधी षडयंत्र रचत असून त्यामुळे नेपाळ आणि भारताचे संबंध बिघडत आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये भारतविरोधी संघटनांना बळकटी प्राप्त होतेय.

नेपाळ पोलिसांनी अटक केलेल्या दाऊदचा साथीदार अल्ताफ हुसेन अन्सारी याने पोलिसांच्या चौकशीमध्ये अनेक रहस्ये उघडकीस आणलीत. बनावट सोनं आणि बनावट नोटा देऊन भारतीय अर्थव्यवस्था नष्ट करण्याचा आयएसआयचा कटही चौकशीमध्ये उघडकीस आलाय. अल्ताफचा संबांध युनुस अन्सारी या नेपाळी बनावट व्यवसायाशी आहे.

अहमदाबादमधील (राज्य-गुजरात) संजय पटेल आणि निलेश शाक्य यांच्यासह त्यांनी भारताच्या विविध भागांत बनावट सोन्याची पुरवठा केला आहे, असेही अल्ताफने सांगितले. बनावट नोटा आणि बनावट सोन्याच्या व्यवसायात पाकिस्तानी दूतावास आणि आयएसआयने नेपाळमध्ये मदत केली होती. हवालाचे पैसे या व्यवसायात गुंतवलेत.

अल्ताफ हुसेन नेपाळी तस्कर युनुस अन्सारी यांच्यासमवेत बनावट नोटा भारतात पुरवत होता. 24 मे 2019 रोजी काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर नेपाळच्या गुप्तचर विभागाने 7.67 कोटी किंमतीच्या बनावट भारतीय चलनाबरोबर सहा जणांना पकडले होते. यात तीन पाकिस्तानी आणि तीन नेपाळ नागरिक असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. पकडलेल्यांमध्ये युनूस अन्सारी याचा देखील समावेश होता, तर अल्ताफ फरार झालाय.

त्यानंतर गुप्तचर विभागाला चकवा देत काही दिवस बनावट नोटांचा काळाबाजर बंद ठेवला होता. त्यानंतर बनावट सोन्याचा बनावट गोरखधंदा सुरू केला. संजय पटेल आणि निलेश शाक्य यांच्या संपर्कात आले. या तिघांनी अनेकदा मुंबई आणि गुजरातमध्ये बनावट सोन्याचा पुरवठा केलाय.

नुकतेच निलेश आणि अल्ताफ हे 15 किलो बनावट सोन्याच्या पुरवठ्यासाठी काठमांडूला गेले होते. त्यावेळी निलेशला अटक केली आहे. तर अल्ताफ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. पण, नेपाळच्या बारा जिल्ह्याच्या पोलिसांनी काठमांडू येथून त्याला अटक केलीय. आता नेपाळ पोलिस संजय पटेलचा शोध घेताहेत. संजय पटेलला 28 जानेवारी 2014 रोजी अहमदाबादमध्ये 35 किलो सोन्यासह पकडले. त्याच्या अटकेसाठी नेपाळ पोलिस भारतीय सुरक्षा एजन्सी यांच्या संपर्कात आहेत.