‘अंडरवर्ल्ड डॉन’ची गुपितं होऊ शकतात उघड, दाऊदच्या ‘जुन्या’ आणि ‘विश्वासू’ साथीदाराला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंडरवर्ल्डचा कुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहिम याचा जुना आणि विश्वासू साथीदार तारिक परवीनला रविवारी अटक करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. एजाज लकडावालाला पोलिसांची अटक केली होती त्याच्या चौकशीत उघड झालेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. गुंड तारिक परवीन हा एजाज लकडावालासाठी काम करत होता.

तारिक परवीनची खंडणी वसुलीमध्ये महत्वाची भूमिका असायची. मुंबईतील दाऊदच्या सध्याच्या व्यवहार व्यवस्थापनाचे काम परवीन करत होता अशी चर्चा आहे. त्यामुळे त्याला झालेली अटक महत्वाची मानली जात आहे. आता डी कंपनीतील हलचालींची माहिती पोलीस मिळवू शकतात.

एका व्यापाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी परवीनला अटक झाली आहे. 3 लाख रुपयांची खंडणी घेऊन देखील तो व्यापाऱ्यांना त्रास देत होता. परंतु लकडावालाच्या अटकेनंतर उघड झालेल्या चौकशीत परवीनचे बिंग फुटले. यापूर्वी तारिक परवीन तुरुंगात देखील होता. त्याची जामिनावर सुटका झाली होती.परवीन शिवाय गॅंगस्टर एजाज लकडावालाचा हस्तक सलीम फर्निचरवाला उर्फ महाराजला देखील या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला होता.

त्यात आरोपींना क्रॉफर्ड मार्केट येथील सुका मेवा विक्रेत्याकडे खंडणीची मागणी केली होती. परवीनने तक्रारदाराकडून 3 लाख रुपये आधीच घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आहे. त्यानंतर परवीनला डोंगरी परिसरातून अटक करण्यात पोलिसांना यश आले. 2018 साली त्याला ठाणे पोलिसांकडून हत्येच्या गुन्हात अटक केली होती.

दाऊदचा हस्तक असलेला कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बिहार, पटना विमानतळावरुन जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. सध्या त्याची चौकशी सुरु असून मुलीला देखील खंडणीच्या गुन्हात अटक करण्यात आली. लकडावालासह महाराज देखील खंडणीच्या प्रकरणात सहभागी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाकडून महाराज याला अटक करण्यात आली.