भाऊबीजेच्या दिवशीच बहिण- भावाने घेतले विष बहिणीचा मृत्यू, भावाची प्रकृती चिंताजनक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – आई वडीलांसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून बहीण व भावाने विषप्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि. 16) भाऊबीजेच्या दिवशीच घडली. या घटनेत बहिनीचा मृत्यू झाला. तर भावावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भोलाणे (ता. जळगाव) येथे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भाऊबीजेच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे भोलाणेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अश्‍विता विजय कोळी (वय 19) असे मृत्यू पावलेल्या बहिणीचे नाव आहे. तर भाऊ विश्‍वजीत विजय कोळी (वय 21) याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोलाणे येथील विजय कोळी हे एसटी महामंडळातून वाहक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते मुंबई येथे नोकरीस होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असून ते तीनही मुले शिक्षणासाठी उल्हासनगर येथे होते. त्यात विश्वजीत विजय कोळी हा आर्किटेक्टचे शिक्षण घेत होता. तर त्याचा मोठा भाऊ देवेश कोळी (वय 23) लहान बहीण अश्‍विता त्याच्या सोबत राहत होती.

कोरोनामुळे टाळेबंदी सुरु झाली आणि त्यानंतर तिघेही भाऊ उल्हासनगर येथून घरी भोलाणे येथे आले होते. सोमवारी (दि. 16) पाडव्याचा आणि भाऊबीजेचा दिवस होता. याच दिवशी विश्वजितला अभ्यासाचे नैराश्य आले. अभ्यासात मन लागत नाही म्हणून तो निराश झाला होता. तसेच आई वडीलांसोबत त्याचा याच कारणावरुन वाद झाला. वाद झाल्यानंतर त्याने घरातील शेतात फवारणीसाठी वापरल्या जाणारे औषध प्राशन केले. त्याच दरम्यान दहा मिनिटांच्या अंतरानंतर त्याची लहान बहीण अश्‍विता हिने देखील घराच्या बाहेर जाऊन विषप्राशन केले. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर दोघांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र अश्‍विता हिचा वाटेतच मृत्यू झाला. रात्री पावणे दहा वाजता देवकर रुग्णालयात तिला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. विश्‍वजीत याला शहरातील अ‍ॅपेक्स या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान उपचार घेत असलेल्या विश्वजीत याला अद्यापही बहिणीच्या मृत्यूबद्दल कुटुंबियांकडून सांगण्यात आलेले नाही.