‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर आरोप होत असल्याने महाविकास आघाडी सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महत्वाची माहिती पोलिसांना दिली आहे. ज्या दिवशी पुजा चव्हाणने आत्महत्या केली. त्याच दिवशी सॅमसंग गॅलक्झी एस -10 या फोनच्या डिस्प्लेवर 45 कॉल हे संजय राठोडचे दिसत आहेत. याचे स्पष्टीकरण पोलीस देणार आहेत का, असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला आहे. मग हा संजय राठोड आहे तरी कोण हे पोलिसांनी सांगावे असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील गोर गरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील पण ठाकरे सरकारमध्ये मंत्री वाचला पाहिजे, अशीच सरकारची भूमिका दिसत असल्याची जबरी टीका वाघ यांनी केली आहे.

पुणे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पोलीस महासंचालकांनी हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेऊन, एका सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. मंत्रिमंडळातील सगळे मंत्री एकच आहेत, पण केवळ मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे. कारण, हा केवळ एका पूजा चव्हाण आणि संजय राठोडचा प्रश्न नसून महाराष्ट्रातील सगळ्या मुली अन् महिलांचा आहे, असेही वाघ म्हणाला. दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांचावर आरोप होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांच्याबाबत नेमका कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.