भरदिवसा झालेल्या गोळीबाराने पुणे हादरले ; ६ तासानंतरही गोळीबाराचे गूढ गुलदस्त्यातच

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन-किरकोळ वादातून दोन गटातील सदस्यांनी एकमेकांवर कोयत्याने वार करुन एका तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील शिंदे आळी या मध्यवस्तीत भरदिवसा घडली. या भांडणात दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यातील एक गोळी तरुणाच्या पायाला लागली आहे. हि घटना आज (बुधवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली असून यामध्ये दोन्ही गटाचे पाचजण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरुन पोलिसांनी बंदूकीची पुंगळी मिळाली आहे.
मंगेश दिलीप धुमाळ (वय ३२, रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ, खडक) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. धुमाळ याच्या गटातील गणेश दारवडकर व मंदार धुमाळ हे किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच, दुसर्‍या गटातील रुपेश पाटील आणि विशाल गुंड हेही किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्यात भरदिवसा थरार….. युवकावर गोळीबार : युवक गंभीर जखमी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मंगेश धुमाळ आणि त्याच्या साथिदारांनी रुपेश पाटील याचा मंगळवारी रात्री पाठलाग करुन शिवीगाळ केली होती. याप्रकरणी रुपेश पाटील याने फडगेट पोलीस चौकीत फिर्याद दिली होती. फडगेट पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आज दुपारी रुपेश पाटील, विशाल गुंड, नयन मोहोळ आणि इतर साथिदार हे शिंदे आळीमध्ये भांडण मिटवण्यासाठी मंगशकडे आले होते. भांडण मिटवत असताना त्यांच्यामध्ये वाद होऊन त्याचे रुपांतर भांडणात झाले. त्यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये मंगेश धुमाळ, गणेश धारवाडकर, मंदार धुमाळ जखमी झाले. तर रुपेश आणि विशाल गुंड यांना मारहाण करण्यात आली.

दरम्यान, मंगेश धुमाळ याच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला. त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी चुकवली तर एक गोळी मंगेशच्या पायाला लागली. यामध्ये तो जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याने पळत जाऊन खडक पोलीस ठाणे गाठले. खडक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे,समीर शेख,  खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पुण्यात भरदिवसा थरार…..युवकावर गोळीबार : युवक गंभीर जखमी

मात्र, नेमका गोळीबार कोणी केला, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. रुपेश, विशाल यांच्यासोबत नयन मोहळ व इतर काही जण होते. दरम्यान नयन मोहोळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. हा प्रकार घडल्यानंतर धुमाळ याच्या घराची तोडफोड करण्यात आली असून यावेळी महिलांचेही वाद झाले.