Kolhapur News : जिल्ह्यातील 12 डीबी पथके ‘बरखास्त’, अवैध धंदे रोखा अन् कडक कारवाई करण्याचे आदेश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील बारा पोलीस ठाण्यात १२ डीबी. पथके (db squads) आहेत. या सर्व पथकांना पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी अवैध व्यवसाय रोखा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, गस्त वाढवा, घरफोडी, चेन स्नॅचिंग रोखा, गुन्हे प्रकटीकरणावर भर द्या, अशा सूचना वारंवार केल्या होत्या. त्यात सर्वच डी.बी. पथके अपयशी ठरली. कोरोनानंतर पूर्वपदावर आलेल्या स्थितीनंतर दुचाकी चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले. शुक्रवारी वर्षातील पहिली गुन्हे आढावा बैठक पोलीस मुख्यालयात झाली. त्यात पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी या पथकाच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली.

गेल्या दोन महिन्यांत जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पथकाने तीन वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल केली. यावर तेथील पथक कायम ठेवण्यात आले, तर अकरा पोलीस ठाण्यांतील पथके बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याच्या सूचना यात केल्या. नवीन पथके नेमण्यासाठी पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांना नियमावली देण्यात आली आहे. वर्षानुवर्षे स्थानिक गुन्हे अन्वेषण, डीबी पथकात काम करणाऱ्यांना यापुढे या पथकात स्थान देऊ नये, अशी सक्त सूचनाही त्यांनी दिली. नव्या दमाच्या तरुणांना या पथकात संधी द्या. इच्छुकांची यादी तयार करून ती पोलीस उपअधीक्षकांकडे द्यावी. त्यांनंतर उपअधीक्षक त्या इच्छुक कर्मचाऱ्याची परीक्षा घेतील आणि त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याची या पथकात नेमणूक होईल.

डी.बी. पथकांमध्ये येण्यासाटी काही निकष सांगितले आहे ते म्हणजे, डी.बी. पथक किंवा एलसीबीमध्ये दोन वेळा काम केलेल्या कर्मचाऱ्यांना स्थान नाही. उपअधीक्षक इच्छुकांची परीक्षा घेणार. त्यात हद्दीतील सराईत, नोंदीत गुन्हेगारांची माहिती, पद्धत, अवैध व्यवसाय, व्यावसायिकांचे पत्ते, हद्दीतील उपद्रवी घटक, संवेदनशील ठिकाणे, आदींची चाचणी या परीक्षेत होणार आहे. शहर उपअधीक्षकांचा शेरा, सेवा पट, निलंबन, कसुरीवर बदली नसावी. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची त्वरित दखल घेऊन तक्रार दाखल करने, महिला व लहान मुले, यांच्या अपहरण, विनयभंग यासारख्या गुन्ह्यावर वचक बसण्यासाठी ऑपरेशन मुस्कान सलगपणे सुरू ठेवणे, गुन्ह्याची संख्या जरी जास्त असली तरी गुन्हा नोंद करण्याचे प्रमाण वाढवणे, सध्या सुरु असलेलया ग्रामपंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने एक हजारांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. तडीपार गुन्हेगारांना केवळ मतदानाच्या दिवशी दोन तासांची मुभा दिली जाणार आहे. आणि निर्भया पथकाकडून विनयंभगासारखे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात पेट्रोलिंग, मॅपिंग पॅटर्न बदलून नियमित कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षक बलकवडे यांनी दिल्या आहेत.