Nagar New : शेवगावमध्ये शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

शेवगाव/नगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव हे गाव दुहेरी हत्याकांडाने हादरुन गेले आहे. शेवगाव शहरामध्ये मुंडके नसलेल्या एका 60 वर्षाच्या महिलेचा तर दुसरा एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव शहरानजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत काही नागरिकांना आज (रविवार) दुपारी बाराच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास पाबरा, रवि शेळके, सुधाकर दराडे, अच्युत चव्हाण अनमोल चन्ने, दिलीप राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथील मोकळ्या जागेत एका 60 वर्षाच्या महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. तर काही अंतरावरील झुडुपात एका 10 ते 15 वयोगटाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाच्या डोक्यात मार लागल्याच्या खुणा आढळून आल्या असून त्या शेजारी विटांचे तुकडे पडलेले होते.

मयत व्यक्ती भटक्या समाजाच्या असल्याने ईदगाह मैदानावर ते उघड्या मैदानात होते. तेथे असलेल्या एका पत्र्याच्या पेटीत पिवळ्या धातूचे मोठी घुंगरू व घंटा होत्या. त्यांचे संसारपयोगी वस्तु अस्ताव्यस्त पडल्या होत्या. दुपारी साडेचार वाजता श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र श्वान जागेवरच घुटमळल्याने माग निघू शकला नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.