बेपत्ता प्रेमीयुगुलाचा खाणीत सापडला मृतदेह

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – यवतमाळ शहरातील एका खदानीजवळ प्रेमीयुगलाने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली आहे. या प्रेमीयुगुलाने दारव्हा मार्गावर असलेल्या भोयर शिवारातील खदानीत आत्महत्या केली. दीपक जाधव (वय-२१ रा. कमलेश्वर मंदिर, लोहारा) असे प्रियकराचे नाव असून मृत मुलगी ही अल्पवयीन आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ग्रथालयात जाते असे सांगून रविवारी घरातून बाहेर पडली. सायंकाळी उशीरापर्य़ंत घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला. मात्र तिचा शोध लागला नसल्याने मुलीच्या घरच्यांनी सोमवारी (दि.४) लोहारा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखलकेली. दीपक हा देखील बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी (दि.५) लोहरा पोलीस ठाण्यात दाखल केला.

पोलिसांनी या दोघांचा शोध घेत असताना नागरिकांनी लोहरा पोलिसांना दरव्हा मार्गावर भोयर शिवारातील पेट्रोलपंपाच्या मागील खदानीजवळ एक दुचाकी आणि कॉलेज बॅग असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात शोध घेतला. त्या परिसरात काही अंतरावर पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पहाणी केली. मात्र, पोलिसांना या ठिकाणी काहीच सापडले नाही.

तपासादरम्यान सापडलेली बॅग आणि दुचाकी दीपकची असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुलीचा मृतदेह दारव्हा मार्गावर असलेले भोयर शिवारातील गिट्टी खदानीजवळी एका खड्‍ड्यात पाण्यात तरंगताना आढळून आला. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी पीयुष जगताप, लोहारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनोने, आदींसह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही नागरिकांच्या मदतीने त्या मुलीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. दरम्यान, काही नागरिकांना पाण्यातून बुडबुडे बाहेर निघताना दिसले. त्यावरून संशय बळावला. शोधमोहीम सुरू करण्यात आली. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर आढळून आला. पुढील तपास लोहारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.