विहिरीत माय-लेकराचा मृतदेह, परिसरात प्रचंड खळबळ !

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – वडगाव निंबाळकर (ता बारामती) इथं सोमवारी (दि 28 सप्टेंबर) सकाळी गावाशेजारील एका विहिरीत माय-लेकराचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुषमा प्रमोद लोणकर (वय 26) व वीर प्रमोद लोणकर (वय 1वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं.

समोर आलेल्या माहितीनुसार, लोणकर यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळं मृत सुषमा यांनी त्यांना माहेरी सोडवा असा आग्रह पतीकडे रविवारी (दि 27 सप्टेंबर) रात्री धरला होता. समोवारी बघू असं उत्तर पतीनं दिलं होतं. परंतु भीतीपोटी महिलेनं गावाशेजारील शिलाईचा मळा परिसरातील एका विहिरीत एक वर्षाच्या चिमुकल्यासह पहाटेच आत्महत्या केली. सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पोलिसांना खबर देत मृतदेह बाहेर काढण्यात आले.