प्रजासत्ताक दिनीच पोलिस कर्मचार्‍याची विष प्राशन करून आत्महत्या

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रजासत्ताक दिनाची ड्युटी करून घरी आल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली निर्जन शेतशिवारात मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे चंद्रपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मंगेश जक्कुलवार असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मंगेश हे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रात्री उशिरा कर्तव्यवर रुजू झाले होते. ड्युटी पूर्ण झाल्यानंतर मंगेश सकाळी घरी गेले. त्यानंतर काही वेळाने त्यांचा मृतदेह राजुरा ते बल्लारपूर या शहराच्यादरम्यान रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली निर्जन शेतशिवारात आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच मंगेश यांच्या कुटुंबीयांनी आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत घटनेबाबत अधिक तपास सुरु केला. मंगेश हे पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकात कार्यरत होते. त्यांनी अचानक इतक्या टोकाचा निर्णय का घेतला याविषयी तर्क – वितर्क लावले जात आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण काय ? त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली का ? यावर पोलिसांनी मौन बाळगले आहे. दरम्यान, ही घटना आणि आत्महत्येमागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.