Pune : खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका 90 वर्षीय महिलेचा मृतदेह दुस-याच नातेवाईकांकडे सोपविल्याचा धक्कादायक प्रकार औंध जिल्हा सरकारी रुग्णालयात समोर आला आहे. सुरुवातीला रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना त्यांच्याच रुग्णाचा मृतदेह सोपविल्याचा दावा केला. दरम्यान इतक्या गंभीर चुकीकडे दुर्लक्ष कसे काय केले जाते, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली आणि चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात कोणी दोषी आढळणा-यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. अखेर सत्य काय आहे जाणून घेण्यासाठी बोटाचे ठस्से आणि डिएनए टेस्टची तयारी सुरू आहे. या टेस्टेचे रिपोर्ट आल्यानंतरच नेमका मृतदेह कोणाचा आहे हे समजणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, रखमाबाई जाधव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर मृतदेह शवागारात पाठवला. दुसऱ्या दिवशी रखमाबाईचा मुलगा दिपक जाधव आणि सून माया जाधव रुग्णालयात पोहचले. त्यांना सोपविलेला मृतदेह पाहून दोघांनाही धक्काच बसला कारण तो मृतदेह दुसऱ्याच महिलेचा होता. याबाबत रुग्णलायाच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, रात्री रुग्णालयात दोन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला होता. दोन्ही मृतदेह शवागारात ठेवले होेते. एका मृतदेहाची ओळख पटवून नातेवाईक घेऊन गेले. दुसरा मृतदेह रखमाबाई यांचाच आहे. नातेवाईकांनी तो ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार करावे असेही त्यांनी सांगितले. रुग्णालय प्रशासनाचे उत्तर ऐकूण हैराण झालेले नातेवाईक म्हणाले की, ज्या आईने लहापणापासून सांभाळले तिला ओळखण्यात आम्ही चूक कशी करु. अखेर या प्रकरणात सत्य जाणून घेण्यासाठी बोटाचे ठस्से आणि डिएनए टेस्टची तयारी सुरू आहे. रिपोर्ट आल्यानंतरच समजणार आहे की शवागारात ठेवलेला मृतदेह रखमाबाई यांचा आहे की नाही? दरम्यान जे लोक रखमाबाईचा मृतदेह घेऊन गेले त्यांच्याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.