धक्कादायक ! सातारार्‍यातील जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आढळले मृत अर्भक, प्रचंड खळबळ

पोलिसनामा ऑनलाईन टीम क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात मृतावस्थेतील अर्भक सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काल ही बाब उघडकीस आल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हा रुग्णालयात रोजच्याप्रमाणे साफसफाईचे काम सुरु असताना वॉर्ड क्रमांक सातच्या स्वच्छतागृहात मृत अर्भक स्वच्छता कर्मचार्‍यांना दिसून आले. या स्वच्छतागृहात पाणी साठून राहत असल्याने याची सफाई करण्यात आली यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सातारा शहरात वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाल्याने या घटनेबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

27 जुलै रोजी 20 आठवड्यांची एक गर्भवती महिला चौथ्यांदा बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी डॉक्टरांनी तिला तपासले असता तिची प्रकृती नाजूक होती व बाळ पोटातच दगावले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना संबंधित महिला, डॉक्टर आणि परिचारिकांची नजर चुकवून विनापरवानगी स्वच्छतागृहात गेली. यावेळी तिचे मृत अर्भक स्वच्छतागृहात पडल्याचे आढळून आले. त्यानंतर सफाई कर्मचारी व व्यवस्थापनाने हे मृत अर्भक 29 जुलै रोजी महिलेच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याबाबत महिलेच्या नातेवाईकांची कोणतीही तक्रार नाही. या महिलेवर उपचार पूर्ण झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले आहे. याबाबत चौकशीचे आदेश दिले असून चार जणांच्या समितीकडून या विषयाची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.