प्राप्तिकर विवरणपत्रासाठी 30 नोव्हेंबपर्यंत मुदत वाढविली

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्षांसाठी कर विवरणपत्रे दाखल करण्याच्या मुदतीत प्राप्तिकर विभागाने आणखी दोन महिन्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. 2019-20 या कर-निर्धारण वर्षांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2020 वरून 30 नोव्हेंबर 2020 करण्यात येत असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केले.

आर्थिक वर्ष 2018-19च्या विलंबित आणि सुधारित विवरणपत्रांनाही ही मुदतवाढ लागू होणार आहे. अशा करदात्यांना उपलब्ध करण्यात आलेली ही चौथी मुदतवाढ आहे. सर्वात प्रथम मार्चमध्ये विवरणपत्रे दाखल करण्याला 31 मार्च ते 30 जून अशी मुदतवाढ दिली गेली. नंतर जूनमध्ये ही मुदत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली. जुलैमध्ये पुन्हा ती 30 सप्टेंबर अशी निर्धारित करण्यात आली होती. आता त्यासाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख ठरविण्यात आली आहे. विवरणपत्र दाखल करण्यासाठी दिल्या जात असलेल्या अतिरिक्त कालावधीमुळे, अधिकाधिक करदात्यांनी करविषयक अनुपालन करून विवरणपत्रातून त्याची पूर्तता करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. मागील सहा महिन्यांत, 29 सप्टेंबपर्यंत प्राप्तिकर विभागाने 33 लाखांहून करदात्यांना 1.18 लाख कोटी रुपयांचा कर-परतावा (रिफंड) दिला आहे.