निरा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू

भोर (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन – निरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या मावस भावांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.५) दुपारी साडेतीनच्या सुमारास चिखलावडे गावाजवळ घडली. दोन भावांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

अनिकते शंकर कोंढाळकर (वय-१५ रा. चिखलावडे) आणि मिलिंद जाधव (वय-१७ रा. नारायणपूर ता. पुरंदर) असे मृत्यू झालेल्या सख्या मावस भावांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत हा त्याच्या मामाकडे आज दुपारी दोन वजाता आला होता. तीनच्या सुमारास अनिकेत आणि मिलिंद हे दोघे गावाजवळ असलेल्या निरा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात पोहत असताना दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान ही घटना ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.

काही दिवसांपूर्वी नाटंबी येथील एका मुलाचा कालव्याच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज नाटंबी गावाजवळ असलेल्या चिखलावडे गावातील दोन सख्ख्या मावस भावांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.