दीड वर्षे गळ्यात अडकलेली तार वागवत संघर्ष करणाऱ्या ‘तिची’ शर्थ अखेर थांबली

पांढरकवडा : पोलीसनामा ऑनलाइन – दीड वर्षापूर्वी तिच्या गळ्यात तार अडकलेली आढळून आली. ती तार घेऊनच ती गेली दीड वर्षे जगण्याचा संघर्ष करत होती. अखेर हा संघर्ष रविवारी संपला. टिपेश्वर अभयारण्यातील टी ४ वाघिणीचा रविवारी रात्री मृत्यु झाला.

टिपेश्वर अभयारण्यातील टी ४ वाघिणीच्या गळ्यात तार अडकल्याचे ११ सप्टेंबर २०१७ रोजी आढळून आले होते. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने पशुवैद्यकाचे मार्गदर्शनात या वाघिणीवर उपचार करण्यासाठी तिला जेरबंद करण्याची मोहीम आखली. मात्र, या वाघिणीची हालचाल अभयारण्याच्या क्षेत्रातील पाणवठ्यावर फक्त रात्रीचे वेळी होत असल्याने तिला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करणे शक्य झाले नाही. ही वाघीण गेल्या वर्षी ५ मे २०१८ पर्यंत आढळून येत होती. त्यानंतर ती अभयारण्यात प्रत्यक्ष दिसली नाही़ किंवा कॅमेरा ट्रॅपमध्ये तिचे फोटो मिळाले नाही. त्यानंतर १६ मार्च २०१९ रोजी ही वाघीण अभरण्याच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळून आली.

रविवारी वन कर्मचारी त्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यासाठी गेले असताना त्यांना ही वाघीण नाल्यामध्ये दिसून आली. तिची हालचाल खूप मंद झाली होती. तिला नीट उभे राहता येत नव्हते. तेव्हा तिला पकडून ट्रँक्युलाईस गनद्वारे बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रेस्क्यु व्हॅनमधून नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी रात्री ८ वाजता तिचे निधन झाले, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केले आहे. सोमवारी तिचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.