दुर्देवी ! डोलीतून 3 KM पायपिट करत नेलं गरोदर महिलेला, मात्र वेळेत उपचार न मिळाल्यानं माता-बालकाचा मृत्यू

खोडाळा : पोलीसनामा ऑनलाइन – मोखाडा तालुक्यातील खोडाळा भागातील अतिदुर्गम आमले येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदनाकाळात रुग्णवाहिका आणि वेळेत उपचार न मिळाल्याने तिला आपला जीव गमवावा लागला आहे. मनीषा सन्या दोरे (२५) असे या महिलेचे नाव असून, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० च्या दरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सात महिन्यांच्या गरोदर असणाऱ्या मनीषा यांना अचानक रक्तस्त्राव आणि प्रसूतिवेदना मंगळवारी १७ नोव्हेंबरला सुरू झाल्या. तेव्हा परिसरातील आशा कार्यकर्ता मंगला वारे यांनी १०८ रुग्णवाहिकेस संपर्क साधला. पण रुग्णवाहिका अडीच तासांनंतर गावाच्या वेशीवर आली. त्यावेळेत ग्रामस्थांनी या महिलेस डोली करून तीन किलोमीटर पायपीट करत खोडाळा-वाडा या मुख्य रस्त्यापर्यंत आणले. या अडीच तासांच्या काळात महिलेच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव आणि पाणी बाहेर पडले.

त्यानंतर, तिची खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून पुढच्या उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच रात्री तिचे सिझरिंग करण्यात आले. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. परंतु, त्याच रात्री त्या बाळाचा मृत्यू झाला आणि मनीषाही अत्यवस्थ झाली. तिच्यावर उपचार सुरू असतानाच मनीषाचा गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, या महिलेला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी प्रथोमचार केले. तिचा रक्तदाब कमी झाल्याने त्याचसोबत रक्तस्त्राव होत असल्याने तिला तात्काळ नाशिकला हलवण्यात आले. खोडाळा प्राथमिक केंद्रात असलेली १०८ रुग्णवाहिका कोविड सेंटरला दिली आहे. आम्ही १०८ ची अनेकदा मागणी केल्याची माहिती, खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. सागर मुकणे यांनी दिली.