पंढरपूरचे आमदार भारत भालकेंचे निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेले राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून ते निवडूण आले होते. भालके यांना मागील महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता. परंतु, यातून ते बरे झाले होते. यानंतर प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारपासून प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मध्यरात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आमदार भालके यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आमदार भालके यांचे चाहते आणि कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

काल दुपारी त्यांची प्रकृती स्थिर परंतु चिंताजनक असल्याचे रूबी हॉल क्लिनिकच्या मेडिकल बुलेटीन मध्ये म्हटले होते. यानंतर त्यांचे कार्यकर्ते आणि कुटुंबियांमध्ये अस्वस्थता दिसून येत होती. सर्वांनी त्यांच्या स्वास्थ्यासाठी इश्वराकडे प्रार्थना सुरू केली होती. सोशल मीडियातून सुद्धा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून त्यांचे चाहते इश्वराला प्रार्थना करत होते.

मात्र, मध्यरात्री भारत भालके यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. तत्पूर्वी त्यांची प्रकृती खालवल्याचे समजताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, रूपाताई चाकणकर आणि पदाधिकार्‍यांनी रुबी हॉल मध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि डॉक्टरांशी सुद्धा चर्चा केली होती.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आमदार भारत भालके यांच्या निधनाचे वृत्त समजताच ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटले आहे की, आमदार भारत भालके यांचे निधन अत्यंत दुःखदायक व अविश्वसनीय आहे. काँग्रेस पक्षात असताना त्यांचा अनेकदा संपर्क यायचा. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची धडपड व कारखान्याच्या करिता चिंता मी पाहिली आहे. एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला. भावपूर्ण श्रद्धांजली.

You might also like