हॉस्पीटलमध्ये झाला बाळाचा मृत्यू, बापानं केलं आंदोलन अन् लोकांचे डोळे पाणावले

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – नऊ महिन्याच्या गर्भवतीला प्रसूतीकळा नसताना ही डॉक्टरने जबरदस्तीने निर्दयपणे महिलेची प्रसूती केली. प्रसूती वेळेस बाळाचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे काही दिवसांपूर्वी घडली होती. याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करुन घेत नसल्याच्या कारणावरुन तक्रारदार इसमाने उपविभागीय कार्यालयातील खांबाला स्वतःला बांधून आमरण उपोषण केलं आहे. दरम्यान, या उपोषणानंतर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली आहे.

जळगाव तालुक्यातील जामोद येथील समाधान हॉस्पिटल मधील डॉ. अविनाश पाटील यांनी महिलेची प्रसूती अतिशय क्रूरपणे केल्याने सदृढ असलेले बाळ प्रसूती दरम्यान दगावले, असा आरोप जामोद तालुक्यातील आसलगाव येथील रहिवाशी संजय भोंगळे यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी या हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी म्हणून सर्व स्तरावर तक्रारी केल्या. पण महिना उलटल्यानंतर सुद्धा कारवाई न करण्यात आल्याने शुक्रवापासून संजय भोंगळे यांनी उपविभागीय कार्यालयातील खांबाला स्वत:ला बांधून घेऊन हॅन्ड लॉक आमरण उपोषणास सुरुवात केली. दरम्यान, भोंगळे यांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. आणि आंदोलनांची दखल घेत रात्री लेखी आश्वासन दिल्यानंतर संजय भोंगळे यांनी आंदोलन मागे घेतले.

जामोद तालुक्यातील डॉ. महिला उज्वला पाटील यांच्याकडे जामोद तालुक्यातील आसलगाव येथील शारदा भोंगळे या महिलेचा प्रसूती बाबत उपचार सुरु होता. उज्वला पाटील या शासकीय सेवेत तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पण डॉ. उज्वला पाटील यांचे पती डॉ. अविनाश पाटील यांनी पेशंट शारदा हिला स्वत:च्या क्लिनिकमध्ये नेऊन तिला प्रसूती कळा येत नसताना तिची जबरदस्तीने प्रसूती केली. पुढे जात महिलेच्या गर्भपिशवीत हात घालून बाळाची ओढाताण करत बाळाला बाहेर काढले आणि त्यात बाळाचा मृत्यू झाला.