रस्त्याअभावी रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – रस्त्याअभावी चादरीच्या झोळीतून बाळाला रुग्णालयात नेत असताना उशीर झाल्यामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना पालघर तालुक्यातील दुर्वेस काटेला पाडा येथे घडली. शेताच्या बांधावर एका गर्भवतीची मुदतपूर्व प्रसूती झाली. घटना समजल्यानंतरही आरोग्य कर्मचारीही महिलेकडे पोहोचले नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

पालघर तालुक्यातील दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीत 50 कुटुंबाचे वास्तव्य असलेला काटेला पाडा आहे. हा पाडा अनेक सुविधांपासून वंचित आहे. पाड्यापासून मुख्य रस्त्याकडे जाणारा रस्ता नसल्याने येथील नागरिकांना शेतांच्या बांधावरून कच्च्या वाटेने जावे लागते. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणाहून एक किलोमीटर अंतरावर असताना जोड रस्त्याअभावी पावसाळ्यादरम्यान येथील नागरिकांची गैरसोय होत आहे.

शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास काटेला पाडयातील शुभांगी विनोद वळवी या सात महिन्यांच्या गर्भवतीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. रस्ता नसल्याने महिलेचा पती आणि त्याच्या नातेवाईकांनी तिला चादरीच्या झोळीतून दुर्वेसच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात होते. मात्र, शेताच्या बांधावर त्या महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिचे बाळ दगावले. मुदतपूर्व प्रसूती झाल्याने बाळ दगवल्याचे आरोग्य विभागाने म्हटले असले तरी या रस्त्याअभावी ही प्रसूती होऊन बाळ दगावले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.