पोलिसांनी केलेल्या मारहाणीत आदिवासी तरुणाचा मृत्यू

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – यवतमाळ जिल्ह्यातील दराटी (ता. उमरखेड) पोलिसांनी केलेल्या मारहाणीत बोरी येथील आदिवासी युवकाचा मृत्यू झाला. प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी मृतदेह चक्क दुचाकीवरुन नेत नांदेड जिल्ह्यातील गोकुंदा (ता. किनवट) येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवला आणि तेथून पसार झाला. संजय बुरकुले (३५) असे तरुणाचे नाव आहे.

दराटी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता बोरी शिवारात एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या वेळी काही जुगारी पळून गेले मात्र त्याच दरम्यान शेतात जाणाऱ्या बोरी वनग्राम येथील या संजय बुरकुले विवाहित युवकास जुगार खेळणारा समजून पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यात तो ठार झाला. मात्र त्यानंतर भंबेरी उडालेल्या पोलिसांनी मृतदेह दुचाकीवर नेत गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात चार वाजता दाखल केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ ए.आर.जुबेरी यांनी मृत घोषित केले. दराठी पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधला असता दूरध्वनी आऊट ऑफ कव्हरेज दाखवला. त्याला करण्यात आलेल्या मारहाणीत तरुण दगावल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.