कोरोना उपचारासाठी मांत्रिकाकडे गेलेल्या महिलेचा मृत्यु; मेळघाटात खळबळ, तब्बल 20 तासानंतर अंत्यसंस्कार

अमरावती : कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली ४५ वर्षाची महिला ग्रामीण आरोग्य रुग्णालयातील औषधे तेथेच सोडून उपचारासाठी जवळच्या गावातील मांत्रिकाकडे (भूमका) गेली. तेथे तिचा मृत्यु झाला. पॉझिटिव्ह असल्याने प्रशासनाने अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नातेवाईकांनी विरोध केला. त्यामुळे तब्बल २० तासानंतर या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मेळघाटातील सेमाडोह गावात ही घटना घडली.

मेळघाटात आदिवासी सर्दी, खोकला, ताप अशा प्रत्येक आजारावर आणि शुभ कार्यासाठी भूमकाकडे उपचारासाठी जातात. लहान मुलांच्या अंगावर डम्मा (गरम विळ्याचे चटके) देण्यासह विविध अघोरी उपचार या मांत्रिकांकडून केले जात असतात. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सेमाडोह येथील ४५ वर्षाची महिला तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यानुसार डॉक्टरांनी या महिलेला होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देऊन औषधे दिली. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला तरी आपल्याला काहीच झालेले नाही, असे तिने येथील डॉक्टरांना सुनावले व उपचारासाठी सेमाडोहपासून १० किमी अंतरावरील भवई गाव गाठले. तेथे नातेवाईकांकडे जाऊन कोरोनावर मांत्रिकाकडून उपचार सुरु केला. आजार बळावल्याने गुरुवारी तिचा मृत्यु झाला.

त्यानंतर तिचा मृतदेह सेमाडोह येथील घरी आणण्यात आला. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आरोग्य कर्मचारी पीईपी किट व साहित्य घेऊन घरी गेले. परंतु, तिचे नातेवाईक ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते. त्यांच्या हट्टामुळे या महिलेचा मृतदेह रात्रभर घरीच ठेवण्यात आला. या प्रकार चिखलदराच्या तहसीलदार माया माने यांना समजला. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी समजूत घातल्यानंतर शुक्रवारी दुपारी या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.