पुण्यात पहाटे भांडारकर रोडवरील घराला लागलेल्या आगीत 46 वर्षीय संदीप गोखलेंचा दुदैवी मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भांडारकर रोडवरील एका घरात लागलेल्या आगीत तरुणाचा भाजून दुदैवी मृत्यु झाला. ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
संदीप विनायक गोखले (वय ४६, रा. राजेश्री, गल्ली क्रमांक ६, भांडारकर रोड) असे या तरुणाचे नाव आहे. तो घरात एकटाच होता. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

याबाबत अग्निशामक दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, भांडारकर रोडवरील गल्ली क्रमांक ६ मधील राजेश्री सोसायटीच्या आऊटहाऊसमध्ये पहाटे २ वाजून ५३ मिनिटांनी आग लागल्याची अग्निशामक दलाला खबर मिळाली. एरंडवणा येथील गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. सुमारे २९० स्क्वे़ फुटच्या या जागेतून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. आतून दरवाजा बंद होता.

एरंडवणा आणि कसबा केंद्राचे जवान व देवदूत यांच्या कर्मचार्‍यांनी काही वेळातच ही आग विझवली. घरात संडास, बाथरुम व एक खोली आहे. खोलीतील आतील सर्व पुस्तके व इतर साहित्य जळून खाक झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी आत जाऊन पाहिले असता तेथे एक तरुण भाजलेल्या अवस्थेत निपचित पडून असलेला आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्याचा मृत्यु झाला असल्याचे सांगण्यात आले.