कारागृहात मारहाण झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – हर्सूल पोलीस ठाण्यात दाखल असेलेल्या गुन्ह्यामध्ये योगेश रोहिदास राठोड (वय-२९ रा. भारंबा तांडा, ता.कन्नड. हल्ली मुक्काम कृष्णा ईश्वर कॉलनी मयूरपार्क, औरंगाबाद) याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली होती. कारागृहात त्याला बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीमुळे योगेशचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

राठोड हा मिस्त्री काम करतो त्याच्या विरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले होते. १७ जानेवारी रोजी हर्सूल पोलिसांनी योगेशला अटक करुन न्यायालयात हजर केले होते. त्याचा जामीन घेण्यासाठी कुणीच न आल्याने त्याला न्यायालयाने कारागृहात पाठवले. वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी त्याला जेलच्या ताब्यात सायंकाळी सात वाजता दिले होते. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजता कारागृह पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. योगेश राठोडला प्रचंड मारहाण करण्यात आल्याने तो बेशुद्ध झाला होता. त्याच्यावर घाटी येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्याच्या हातावर, पाठीवर, पायावर आणि पोटात मारहाणीच्या खूणा स्पष्टपणे दिसत होत्या. आय सी यू मध्ये उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, कारागृहातील पोलिसांनी योगेशला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे याप्रकरणी दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी योगेशचा भाऊ सचिनने केली आहे. योगेशचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईक घाटीत जमा झाले होते. जोपर्यंत दोषीवर गुन्हे दाखल होत नाही आणि त्याना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच तातडीने घाटी रुग्णालयात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे, गोवर्धन कोळेकर, गुणाजी सावंत बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा रुग्णालयात तैनात करण्यात आला होता.