नीरेतील ‘जुबिलंट’ च्या विषारी वायू गळती दुर्घटनेमधील एका अधिकाऱ्याचा मृत्यु

पुरंदर : पोलिसनामा ऑनलाईन – नीरा गावच्या हद्दीवरील व निंबूत (ता.बारामती) येथील जुबिलंट लाईफ सायन्सेस कंपनी मधील वायू गळतीमध्ये संजय जगन्नाथ ढवळे या अत्यवस्थ अधिका-याचा मंगळवारी (दि.७) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे येथील केईएम रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला. ही घटना नीरा व परिसरात वा-या सारखी पसरल्यामुळे नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे.

निंबुत – नीरा येथील घातक रसायन उत्पादन करणाऱ्या जुबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीत १७ एप्रिल २०१९ रोजी अ‍ॅसीटिक अनहायड्राईड या टाकीतून विषारी वायू गळतीमुळे लोकांना डोळ्यात व फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात वेदना झाल्याने सुमारे ४८ कामगार बाधित झाले होते. त्यापैकी अत्यवस्थ असलेल्या काही कामगारांना पुणे येथील केईएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

त्यापैकी संजय जगन्नाथ ढवळे (वय- ५६) या अत्यवस्थ अधिका-याचा मंगळवारी (दि.७) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे येथील केईएम रूग्णालयात उपचारा दरम्यान मुर्त्यु झाला. ढवळे हे जुबिलंट कंपनीत लाजिस्टिक डिपार्टमेंट मध्ये सिनियर एक्झिक्युटीव्ह म्हणून कार्यरत होते. हल्ली ते जुबिलंट कंपनीच्या कॉलनीमध्ये रहात होते. ढवळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असून त्यापैकी एक विवाहित मुलगी, दोन भाऊ आहेत. लोणंद (ता. खंडाळा) या ढवळे यांच्या मूळ गावी त्यांच्यावर बुधवारी (दि.८) दुपारच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला.

दरम्यान , जुबिलंट कंपनीमध्ये वायुगळतीमुळे झालेल्या दुर्घटनेची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले असून कंपनीने उत्पादन चालू ठेवले आहे कि नाही हे समजू शकले नाही. तसेच जुबिलंट कंपनीच्या दुर्घटनेमुळे अजूनही कंपनी परिसरातील नागरिका’मध्ये घबराहट आहे.